Mahalaxmi Vrat : पितृपक्ष अष्टमीला करा ‘लक्ष्मी पूजन’, धनलाभासाठी ‘हे’ उपाय उत्तम

पोलीसनामा ऑनलाइन – भाद्रपद महिन्यातील वद्य पक्षातील म्हणजेच पितृपक्ष पंधरवड्यातील अष्टमी तिथी ही धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. देशभरातील बहुतांश साधक संपूर्ण वर्षभर या तिथीची आतुरतेनं वाट पहात असतात असं सांगितलं जातं. खास करून आर्थिक लाभ आणि उन्नतीची मनोकामना असणाऱ्यांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शास्त्रांनुसार, राधाष्टमीपासून ते भाद्रपद वद्य अष्टमीपर्यंतचा कालावधी सुरैया पर्व म्हणून ओलखला जातो.

या कालावधीत यक्ष याक्षिंनी यांची साधना धनवृद्धीसाठी केली जाते. राधाष्टमी ते भाद्रपद वद्य अष्टमीच्या काळात साधना करू न शकणाऱ्या साधकांनी सुरैया पर्वाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच भाद्रपद वद्य अष्टमीला लक्ष्मी देवी आणि कुबेर यांचे पूजन करावे. भाद्रपद अष्टमी तिथी लक्ष्मी व्रतासाठी विशेष मानली जाते असं सांगितलं जातं. लक्ष्मी देवीचा कृपाशीर्वाद आणि धनलाभाचे उत्तम योग जुळून येण्यासाठी नेमके कोणते उपाय उपयुक्त ठरतात ? जाणून घेऊयात गजलक्ष्मी व्रतपूजन

लक्ष्मी व्रतांमधील महत्त्वाचं व्रत म्हणजे गजलक्ष्मी व्रत आहे. या व्रतात लक्ष्मी देवीची गजलक्ष्मी रुपात पूजा केली जाते. समुद्रमंथनावेळी लक्ष्मी देवी प्रकट झाली होती. यावेळी ऐरावतानं लक्ष्मी देवीवर जलाभिषेक केला तेव्हापासून तिला गजलक्ष्मी संबोधलं गेलं. शास्त्रानुसार गजलक्ष्मी व्रतामुळं लक्ष्मी देवीचे विशेष कृपाशीर्वाद लाभतात. आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी अशी लक्ष्मी देवीची विविध रूपं मानली जातात. गजलक्ष्मीच्या कृपेनं गरीब माणूसही धनवान होऊ शकतो. जसे दुर्वासा ऋषींनी दिलेल्या शापामुळं धनहीन झालेला इंद्र पुन्हा धनवान झाला अशी मान्यता आहे.

‘या’ गोष्टींचा समावेश आवश्यक
धन, धान्यप्राप्तीसाठी लक्ष्मी देवीची उपासना करणारे गजलक्ष्मीचे व्रत आवर्जुन आचरतात. या व्रतपूजेत लक्ष्मी देवीच्या दोन्ही बाजूला गजराजाची स्थापना करावी. याशिवाय कुबेराची स्थापनाही करावी. लक्ष्मी देवीसमोर श्रीफळ, शंख, कौडी, सोनेचांदी, नाणी आणि श्रीयंत्र ठेवावं. जर श्रीयंत्र नसेल तर एका कागदावर लाल शाईनं श्रीयंत्राची प्रतिकृती रेखाटून तो कागद लक्ष्मी देवी समोर ठेवावा असं सांगितलं जातं. या व्रताचरणात गजलक्ष्मी व्रतकता आवश्य ऐकावी किंवा तिचे पठण करावे असंही आवर्जून सांगतलं जातं.

गजलक्ष्मी व्रताचा मंत्र
गजलक्ष्मी व्रतपूजन करताना लाल रंगाच्या वातीनं तुपाचा दिवा लक्ष्मी देवीला अर्पण करावा. खीर, मिसरी आणि मधाचा समावेश असलेला नैवैद्य अर्पण करावा. या व्रतात देवीला गुलाब, कमळ अशी फुलं प्राधान्यानं अर्पण करावी. ओम ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये गजलक्ष्मी नम: या मंत्रानं पूजेच्या ठिकाणी ठेवलेलं विशेष साहित्य मंत्रवून घ्यावं. यानंतर लक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं. गजलक्ष्मी व्रतपूजनानंतर सोने चांदीची नाणी, कौडी लाल वस्त्रात बांधून तिजोरीत किंवा कपाटात ठेवावी. लक्ष्मी देवीची नियमित पूजा करावी असं सांगितलं जातं.

लक्ष्मी देवीचे अष्टावतार
लक्ष्मी देवीची विविध रूपं ही वाहन, वेशभूषा, हात आणि शस्त्रानं ओळखली जातात. महालक्ष्मी, स्वर्गलक्ष्मी, राधाजी, दक्षिणा, गृहलक्ष्मी, शोभा, सुरभी म्हणजेच रुक्मिणी आणि गजलक्ष्मी म्हणजेच सीता असे लक्ष्मी देवीचे 8 अवतार मानले जातात. पशू व धन दात्री देवीला गजलक्ष्मी म्हटलं जातं. पशूंमध्ये हत्तीला राजसी मानले जाते. गजलक्ष्मीनं इंद्र देवाला समुद्रात दडलेलं हरवलेलं धन मिळवण्यात मदत केली होती असं सांगितलं जातं. पांढरा हत्ती हे गजलक्ष्मीचं वाहन आहे.