महंत परमहंस दास यांचं बेमुदत उपोषण ! भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी

अयोध्या : वृत्तसंस्था – तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास हे सोमवारपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. एवढंच नाही तर मुस्लिमांचं नागरिकत्व नष्ट करण्यात यावं, मुस्लिमांना पाकिस्तान आणि बांग्लादेशात पाठवण्यात यावं आणि पाकिस्तान बांग्लादेशातील हिंदूना भारतात आणावं अशीही मागणी त्यांनी केली आहे. परमहंस दास यांनी यापूर्वीही राम जन्मभूमीसाठी अनेक दिवस बेमुद उपोषण केलं आहे.

कोण आहेत परमहंस दास
परमहंस दास हे अयोध्येत राहतात. ते तपस्वी छावनीचे महंत आहेत. मुस्लिमांवरील वक्तव्यांमुळं ते नेहमीच चर्चेत असतात. ऑक्टोबर 2018 मध्ये संत परमहंस यांनी अनेक दिवस राम जन्मभूमीसाठी बेमुदत उपोषण केलं होतं. 1 ऑक्टोबर 2018 रोजी ते अन्न आणि पाण्याचा त्याग करून उपोषणाला बसले होते. प्रशासनानंही त्यांना अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर उपोषणाच्या सातव्या दिवशीच पोलिसांनी आजारपणाचा हवाला देत त्यांना उचललं होतं आणि पीजीआयमध्ये दाखल केलं होतं. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांना आपल्या निवासस्थानी बोलवून त्यांना ज्यूस देऊन त्यांचं उपोषण संपवलं होतं.

चिता रचून आत्मदहन करण्याचीही केली होती घोषणा
परमहंस दास यांनी तपस्वी छावणी मंदिरात बाबर विचारधारा विध्वंस महायज्ञ करण्याचीही घोषणा केली होती. ते 6 डिसेंबरला दुपारी 12 वाजता आपली चिता रचून आत्मदहन करण्याच्या निर्णयावर ठाम होते. राम मंदिर उभारणीच्या मागणीसंदर्भात कसल्याही प्रकारचा निर्णय होत नसल्यानं महंत परमहंस दास नाराज होते. मात्र दोन दिवस आधीच परमहंस यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना सीजीएम न्यायालयातही हजर करण्यात आलं होतं. सीजीएम यांनी त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं.