‘कोरोना’च्या तांडवा दरम्यानच पसरलेल्या नव्या आजाराचा धोका, मुंबईत Covid-19 पॉझिटिव्ह 18 मुलं PMIS च्या विळख्यात, दोघांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात पसरलेल्या कोरोनाचा सगळ्यात जास्त फटका महाराष्ट्र या राज्याला बसला आहे. आता महाराष्ट्रातच दुसऱ्या एका रोगाने तोंड वर काढले आहे. मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉसिटीव्ह 100 लहान मुलांना ऍडमिट केलं आहे. यातील 18 मुलांना PMIS( Paediatric Multisystem Inflammatory Syndrome ) या नवीन रोगाने ग्रासले आहे.

डॉक्टरांनी सांगितल्यानुसार PMIS ची लक्षणे सामान्य असतात, यामध्ये ताप येणे, काही प्रमाणात त्वचा लाल होणे, डोळ्यांत जळजळ होणे आणि पोटदुखी यांचा समावेश होतो. 10 महिन्यापासून ते 15 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये PMIS ची लक्षणे दिसत आहेत. यामुळे आता डॉक्टरांची चांगलीच चिंता वाढली आहे. हॉस्पिटलच्या रिपोर्टनुसार, या 18 मुलांपैकी 2 मुलं कोरोनाने बरी झाली होती पण PMIS मुळे ती दगावली आहेत. वाडिया हॉस्पिटलने ICMR ( Indian Council of Medical Science ) ला याची माहिती दिली असून दुसरीकडूनही याबद्दल माहिती मागवण्यात येत आहे.

वाडिया हॉस्पिटलच्या मेडिकल डायरेक्टर डॉ. शकुंतला प्रभु याबाबद्दल म्हणाल्या की, मार्चपासून आतापर्यंत इथं 600 मुलांना ऍडमिट केलं होतं, यातील 100 मुलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील 18 मुलांमध्ये PMIS ची लक्षणे दिसत आहेत. ही कावासाकीसारखी लक्षणे असून हा रोग लहान मुलांमध्येच दिसून येतो. दुसऱ्या बाजूला PMIS ची लक्षणे 10 महिने ते 15 वर्ष असणाऱ्या मुलांमध्येच दिसत आहेत.

शकुंतला प्रभू यांच्या मतानुसार, या रोगाची लक्षणे वेळेवर ओळखणे गरजेचं आहे. त्यानंतर त्यावर वेळेत उपचार झाले पाहिजे. या 18 मुलांमधील बरेच जण नीट झाले आहेत. ज्या दोघांचा मृत्यू झाला आहे ते PMIS च्या क्रिटिकल कंडिशनमध्ये होते.

PMIS बद्दल अनेक ठिकाणी रिसर्च चालू आहेत. ICMR ला याबद्दल वेळोवेळी माहिती दिली जात आहे. मुंबईनंतर PMIS च्या काही केसेस चेन्नई, दिल्ली आणि जयपूरमध्ये देखील दिसून आले आहेत.