Pune News : मुंबई NCB चा चिंकू पठाणच्या पुण्यातील हस्तकाच्या घरावर छापा, खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवूडमधील कलाकारांना ड्रग्स पुरवणाऱ्या (पेडलर) चिंकू पठाण याच्या पुण्यातील हस्तकाच्या घरावर मुंबई एनसीबीच्या पथकाने छापेमारी केली. आज (शनिवार) ही छापेमारी झाली असून, खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा छापा पडला आहे. पथकाला येथुन महत्त्वाचे पुरावे मिळाले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या प्रकरणाबाबत मात्र पुणे पोलिसांना काहीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले आहे.

अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाच्या तपासादरम्यान ड्रग्स प्रकरणात चिंकू पठाण व फारूक बटाटा या दोघांची नावे समोर आली होती. त्यात ते बॉलिवूडला ड्रग्स पुरवत असल्याचे समोर आले होते. यानंतर या दोघांचा मुंबई एनसीबीकडून तपास सुरू आहे. चिंकू पठाण व फारूक बटाटा हे अटकेत आहेत.

तपासात मात्र चिंकू पठाण याचा पुण्यात एक सप्लायर आसल्याचे समजले होते. त्यानुसार आज मुंबईच्या पथकाने चिंकू पठाण याचा पुण्यातील हस्तकाच्या घरावर छापा टाकला. पण तो फरार झाला आहे. पथकाला येथून महत्त्वाचा पुरावा मिळाले आहे, असे एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले. खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत तो राहत होता.