… जेव्हा कृषीमंत्री स्वतः सामान्य शेतकरी बनून कृषी मालाच्या दुकानात जातात अन्

पोलिसनामा ऑनलाईन टीम – शेतकर्‍यांनी युरिया मिळत नसल्याच्या तक्रारींची कृषीमंत्री दादा भुसे यांनी दखल घेतली आहे. खतं, बियाणं मिळत आहेत की नाही हे तपासण्यासाठी दादा भुसे यांनी स्वत: औरंगाबाद येथील दुकानात जाऊन पडताळणी करण्याचे ठरविले. त्यासाठी भुसे यांनी कृषीमंत्री म्हणून न जाता सामान्य शेतकरी बनून दुकानात पोहोचले. त्यानंतर दुकानदाराने खत असतानाही देण्यास नकार देत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर भुसे यांनी जिल्हा कृषी अधिक्षकांना कारवाईचे आदेश दिले.

शेतकर्‍यांच्या तक्रारींची दखल घेत दादा भुसे यांनी अचानक औरंगाबाद शहराला भेट दिली. जिल्हा यंत्रणेलाही त्यांनी याबाबत कळवले नाही. ते थेट बाजार समितीच्या आवारातील नवभारत फर्टीलायजर या दुकानात शेतकरी म्हणून गेले. यावेळी त्यांनी दुकानदाराकडे 10 गोणी युरिया मागितला. दुकानदाराने मात्र दुकानात युरिया शिल्लक असतानाही उपलब्ध नसल्याचे सांगत देण्यास नकार दिला. स्टॉक रजिस्टरची मागणी केली असता तो घऱी असल्याचे दुकानदाराने सांगितले.

यानंतर दादा भुसे यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना दुकानात बोलावून घेतले. दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा केला असता दुकानात युरियाच्या 1 हजार 386 पिशव्या शिल्लक असल्याचे आढळून आले. यानंतर भुसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत दुकानदारावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. शिल्लक असतानाही युरिया शेतकर्‍यांना न देणे अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही, अशा इशाराही यावेळी त्यांनी दिला.