अबब ! चक्क जॅकेटमधून दारूच्या २४ बाटल्यांची तस्करी

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – दारू तस्करीसाठी अनोखी शक्कल लढवत अजब जॅकेट तयार करून त्यातून दारूची तस्करी करून ती वर्ध्यात विक्री करणाऱ्या एकाला राळेगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या जॅकेटमधून पोलिसांनी तब्बल २४ दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेतय.

ज्ञानेश्वर पिसे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तो यवतमाळमधून दारू वर्ध्यात घेऊन जात विक्री करत होता. पिसे हा कळंबवरून राळेगावला बसने आला होता. त्यावेळी पोलिसांना त्याचा संशय आल्याने त्याला बसस्थानकावर पकडले. त्यानंतर त्याच्याकडून २४ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. पिसे याने दारूच्या तस्करीसाठी अनोख्या पद्धतीने जॅकेट तयार केलं होतं. त्यात तो दारूच्या बाटल्या ठेवून त्या वर्ध्यात विक्री करत होता. दरम्यान दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात अशा प्रकारे यवतमाळ जिल्ह्यातून दारू तस्करी केली जात असून दारूची तस्करी होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.