ठाकरे सरकारची घोषणा ! ‘कोरोना’मुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना 65-65 लाख रुपये देणार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी म्हटले की, राज्यात कोरोना व्हायरसमुळे मरण पावलेल्या प्रत्येक पोलीस कर्मचार्‍याच्या कुटुंबियांना 65-65 लाख रुपए भरपाई म्हणून दिले जातील. तसेच या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी सुद्धा दिली जाईल.

त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रात गुरूवारपर्यंत कोरोना व्हायरसमुळे सुमारे 31 पोलीस कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे. या सर्व मृत पोलीस कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 65-65 लाख रूपये देण्यात येतील. तसेच कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्यात येईल. देशमुख यांनी शुक्रवारी म्हटले की, महाराष्ट्रात यावेळी 5,60,303 लोक विलगीकरणात राहात आहेत.

याशिवाय, गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 11.90 लाख प्रवासी मजुरांना 1 मेपासून 2 जूनपर्यंत 826 श्रमिक विशेष ट्रेन सेवा अंतर्गत 21 राज्यात पाठवण्यात आले. एका अधिकृत वक्तव्यात सांगितले गेले की, महाराष्ट्र सरकारने या मजूरांच्या प्रवासाच्या तिकिटाच्या रक्कमेपोटी 100 करोड रूपये दिले आहेत.

वक्तव्यात म्हटले आहे की, सर्वात जास्त 450 ट्रेन उत्तर प्रदेशासाठी घेण्यात आल्या होत्या. यानंतर बिहारसाठी 177, पश्चिम बंगालसाठी 49, मध्य प्रदेश 34, झारखंड 32, राजस्थानसाठी 20 आणि ओडिशासाठी 17 ट्रेन चालवण्यात आल्या.

यामध्ये म्हटले आहे की, कर्नाटक, जम्मू, छत्तीसगढ़, असम, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, तमिलनाडु, मणिपुर, केरळ, तेलंगाना आणि मिझोरमसाठी सुद्धा ट्रेन चालवण्यात आल्या. 155 ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) येथून रवाना झाल्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून 137 ट्रेन तर पुणे, बोरिवली, बांद्रा टर्मिनस आणि पनवेलवरून अनुक्रमे 78, 72, 65 आणि 45 ट्रेन रवाना झाल्या होत्या.

महाराष्ट्रत शुक्रवारी कोरोना व्हायरसच्या संसर्गाची 2,436 नवी प्रकरणे समोर आल्यानंतर संसर्गाच्या एकुण प्रकरणांचा आकडा वाढून 80,229 वर पोहचला आहे. आरोग्य विभागाने ही माहिती दिली. याशिवाय राज्यात कोरोना व्हायरसमुळे आणखी 139 लोकांच्या मृत्यूसह या महामारीमुळे राज्यात मरण पावलेल्यांची संख्या 2,849 झाली आहे.

शुक्रवारी 1475 रूग्ण बरे झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत एकुण 35,156 लोक या संसर्गातून बरे झाले आहेत. राज्यात आता एकुण 42,224 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एकुण 5,22,946 लोकांची चाचणी करण्यात आली आहे.