वरळीकरांनो… आदित्य ठाकरेंना पाडा, भाजप IT सेलचे आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये युती झाली असली तरी या पक्षाच्या आयटी सेलची अजून युती झाली नसल्याचे दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे भाजपच्या आयटी सेलकडून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली जात असल्याच्या पोस्ट फेसबुकवरून व्हायरल करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे विधानसभेच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना मतदान न करण्याचे आवाहन आयटी सेलकडून करण्यात आले आहे.

फेसबुकवर ‘पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र मिशन 2019’ या पेजवरून विरोधी पक्षावर आणि नेत्यांविरोधात पोस्ट करण्यात येतात. मात्र, आता भाजपसोबत युती करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यावर देखील या पेजवरून टीका केली जात आहे. ‘रोज किड्यामुंग्यांसारखा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची स्थिती बदलेल अशा मेट्रो 3 प्रकल्पाला आदित्य ठाकरे यांनी विरोध केला आहे’. त्यामुळे आदित्य ठाकरेंना त्यांची जागा दाखवाच असे आवाहन या पेजवरून करण्यात आले आहे.

फेसबुक पेजवर केलेल्या पोस्टमध्ये, वरळीकरांनो, आदित्य ठाकरे हे यंदा तुमच्या क्षेत्रातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मुंबईकरांची काळजी नसलेल्या आदित्य ठाकरेंना येत्या निवडणुकीत मतदान न करता सणसणीत उत्तर द्या, असा मजकूर लिहण्यात आला आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना युती झाली असली तरी या दोन्ही पक्षांमध्ये मतभेद कायम असल्याचे पुन्हा समोर आले आहे.

Visit : Policenama.com