थोरातांचा चंद्रकांत पाटलांवर घणाघात, हे केवळ बोलघेवड्यांचे सरकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली, कोल्हापूरला पूर आला त्यावेळी पालकमंत्री तेथे नव्हते. पुण्यातही पूर आला त्यावेळीही पालकमंत्री शहरात नव्हते. त्यामुळे व्यवस्थापनात अडचणी येउन मृतांची संख्या वाढली आणि नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले. पूरग्रस्तांचे पंचनामे अद्याप झाले नसून त्यांना नुकसान भरपाई देखील मिळालेली नाही. केंद्राकडून ६ हजार ८०० कोटी रुपयांचे पॅकेज आणणार अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तरी त्यातील एक छदामही अद्याप मिळाला नाही. हे केवळ बोलघेवड्यांचे सरकार असून त्यांना जनतेशी देणेघेणे नाही, अशी सणसणीत चपराक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावली.

कॉंग्रेस भवन येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत थोरात बोलत होते. पक्षाचे प्रवक्ते सचिन साठे, माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, रमेश बागवे, गोपाळ तिवारी, सत्यजित तांबे, अमीर शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते. ओबीसी समाजासाठी सरकारने फार काम केले आहे, असे सांगणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ओबीसी समाजासाठी नेमके काय काम केले? हे जाहीर करावे. आरक्षणाच्या नावाखाली भाजपने सर्व समाजांची फसवणूक केली आहे. त्यांचे मित्र पक्षच त्याची जाहीर कबुली देत आहेत. विकास कामांच्या बाबतीतही केवळ खोट बोल पण रेटून बोलणार्‍या सरकारने राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

थोरात म्हणाले, की ओबीसींसाठी मोठे काम केल्याचे सांगणार्‍या भाजप सरकारने ओबीसींसाठी प्रती व्यक्ती २५ रुपयांची अंदाजपत्रकात तरतूद केली आहे. ही ओबीसी समाजाची घोर उपेक्षा आहे. अमित शहा यांनी जाहीर करावे की ओबीसींसाठी नेमके काय केले? असे आव्हानही थोरात यांनी दिले. या सरकारने धनगर समाजाचीही फसवणूक केली असून खुद्द रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी त्याची जाहीर कबुली दिली आहे. मात्र, त्यांना सत्ता सोडूशी वाटत नाही. विकास कामांमध्येही या शासनाने आश्‍वासने देवून जनतेची फसवणूकच केली आहे. स्मार्ट सिटी साठी केंद्राकडून २०१६ ते २०१८ मध्ये एकही पैसा मिळाला नाही. स्मार्ट सिटीमध्ये आज पदपथांवर वाहने धावताना पाहायला मिळत आहे. शहराचा शाश्‍वत विकास करण्यात भाजप अपयशी ठरली आहे, असा आरोपही थोरात यांनी यावेळी केला.

कॉंग्रेस थकलीय हे सुशीलकुमार शिंदे यांचे वैयक्तिक मत असून कॉंग्रेस जोमाने प्रगती करतेय. कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी मिळून राज्यात १६० जिंकेल, असा विश्‍वास व्यक्त करतानाच थोरात यांनी उद्धव ठाकरे यांनी आज संगमनेर येथील सभेत केलेली टीका फारशी गांभीर्याने घेण्याची बाब नसल्याचे सांगत, शिवसेनेला चिमटा काढला आहे.

Visit : Policenama.com 

 

You might also like