उदयनराजेंना भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा ‘धक्का’ ! पोटनिवडणूकसाठी ‘इच्छुक’ देखील ‘तयार’ ?

सातारा, पोलीसनामा ऑनलाइन – निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची तारीख घोषित करण्यात आली मात्र उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ही रिक्त जागा भरण्यासाठी होणाऱ्या पोटनिवडणूकीची घोषणा मात्र करण्यात आली नाही. उदयनराजे भोसलेंसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. परंतू यामुळे साताऱ्यातील भाजपच्या अंतर्गत राजकारणाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

उदयनराजेविरोधातील रोषाचा आपल्याला फटका नको, असे भाजपच्या काही इच्छुक उमेदवारांचे मत होते. भाजप नेत्यांनी यासंबंधित मतदारसंघनिहाय आकडेवारी देखील दिली होती. निवडणूक लढण्याची इच्छा असलेल्या इतर इच्छुकांसह शिवेंद्रसिंहराजे भोसले देखील एकत्र विधानसभा आणि लोकसभा पोट निवडणूकीला तयार नव्हते. त्यामुळे सातारा पोटनिवडणुकीच्या मुद्द्यावर भाजपमध्येच राजकारण चांगलेच तापले आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर आपल्या लोकसभा सदस्यत्वाचाही राजीनामा द्यावा लागला. त्याआधी उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेश करताना काही अटी देखील घातल्या होत्या असे सांगण्यात येत आहे. त्यात विधानसभा निवडणुकीसह साताऱ्यातील लोकसभेची पोटनिवडणूक घ्यावी असा आग्रह उदयनराजेंचा होता. परंतू निवडणूक आयोगाने मात्र फक्त विधानसभेची घोषणा केली.

उदयनराजे भोसलेच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते सज्ज –
निवडणूक आयोगाने सातारा लोकसभा पोट निवडणूकीची घोषणा केली नाही. परंतू उदयराजेंविरोधात राष्ट्रवादीतून 4 दिग्गज नेत्यांची नावे सध्या चर्चेत आहेत. त्याच शशिकांत शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. याशिवाय नितीन लक्ष्मणराव पाटील, अविनाश मोहिते आणि श्रीनिवास पाटील यांचे नाव राष्ट्रवादीतून चर्चेत आहे.

You might also like