ठरलं ! ‘या’ दिवशी मुख्यमंत्र्यांचा ‘शपथविधी’, सेनेला सोडून भाजपचा ‘एकला चलो’चा नारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणूकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने युतीत असलेल्या भाजप-शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. दोन्ही पक्षात मुख्यमंत्री पदावरुन वातावरण तापले असताना दावे-प्रतिदाव्यांना उधाण आले आहे. त्यातच भाजपने ‘एकला चलो’ची ठिगणी पेटवली आहे. ‘एकला चलो’ची भूमिका घेत भाजपचा मंगळवारी 5 ऑक्टोबरला वानखेडे स्टेडियममध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ पार पडण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. जे येतील त्यांच्यासोबत जे नाही त्यांच्याशिवाय अशी भूमिका घेत भाजपने एकट्यानेच आपला शपथविधी उरकण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

एवढेच नाही तर या शपथविधी सोहळ्याची जबाबदारी आमदार प्रसाद लाड आणि चंद्रकांत देसाई यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. 2014 सारखाच सत्ता स्थापनेचा सोहळा करण्याच्या तयारीत भाजप आहे. येत्या 5 तारखेला संध्याकाळी शपथविधी समारंभ आयोजित करण्याचे निश्चित केले आहे, हा शपथविधी सोहळा वानखेडे स्टेडियमला पार पडेल. यावर शिवसेना काय भूमिका घेणार आणि काय राजकीय नाट्य रंगणार हा चर्चेला विषय आहे.

2014 साली शिवसेना दीड महिन्यानंतर सरकारमध्ये सहभागी झाली होती. त्यामुळे आता युतीत असलेली शिवसेना काय भूमिका घेणार याकडे राष्ट्रीय स्तरावर लक्ष लागून आहे. 2014 साली मुख्यमंत्र्यासह 10 भाजप नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

विधानसभा निवडणूकांनंतर महाराष्ट्रात मोठे राजकीय नाट्य रंगले आहे. आता निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरुन दोघात रस्सीखेच सुरु झाली आहे. दोन्ही पक्षातील हा संघर्ष मंत्रिमंडळात मंत्रिपदे मिळवण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे. परंतू भाजपकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे कळते आहे. हा तिढा ताणला जात असताना आता भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यातील भाजप नेत्यांना संदेश जारी केला आहे.

अमित शाह मुंबई दौऱ्यावर येऊन सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करणार होते. मात्र शाहांचा दौरा रद्दा झाला आहे. राज्यातील भाजप नेत्यांकडून राज्य स्तरावरच हा तिढा सोडवावा असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस सत्तेची कोणती गणिते सोडवून शिवसेनेसमोर नवा प्रस्ताव ठेवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

शिवसेनेने देखील मुख्यमंत्री पदावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका मांडत म्हटले की, लिहून घ्या, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. याआधी संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची देखील भेट घेतली आहे. त्यानंतर ही भूमिका मांडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता नक्की काय होणार हे अजून अस्पष्ट आहे.

Visit : policenama.com