नालासोपाऱ्यात ‘चोर की पोलीस’ ? राजकीय वातावरण ‘तापले’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. पुढील महिन्यात हि निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार आणि नेते मोठ्या प्रमाणात पक्षांतर करताना दिसून येत आहेत. तसेच अनेक विधानसभा मतदारसंघात वातावरण तापलेले दिसून येत आहे.त्यामुळे नालासोपारा विधानसभा मतदारसंघात देखील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. विविध राजकीय पक्षांनी याठिकाणी जोर लावला आहे. त्यानंतर आता नालासोपाऱ्यात ‘चोर की पोलीस? या लावलेल्या बॅनरमुळे तेथील वातावरण अजूनच पेटले आहे. तसेच या बॅनरमुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या बॅनरवरील हे वाक्य बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर आणि नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्यातील युद्धाचे प्रतीक आहे. यामधील चोर हा शब्द क्षितिज ठाकूर यांच्यासाठी वापरण्यात आला आहे  तर पोलीस हा शब्द प्रदीप शर्मा यांच्यासाठी वापरण्यात आला आहे. त्यामुळं या दोघांमधील लढाईला आतापासूनच सुरुवात झाली आहे. प्रदीप शर्मा यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला असून ते नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

त्या पार्श्वभूमीवर हे बॅनर लावण्यात आल्याची सगळीकडे चर्चा आहे. त्यानंतर आता ज्या एजन्सीने हे बॅनर लावण्यात आले आहेत, त्यांना फोन करून धमक्या दिल्या आहेत. त्यामुळे बहुजन विकास आघाडीच्याच वतीने या धमक्या दिल्याचे देखील सांगण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना प्रदीप शर्मा यांनी म्हटले कि, मागील 30 वर्षांपासून येथे चालणाऱ्या कुशासनाचा आता अंत होणार असून हे बॅनर बरोबर लागले आहेत.

प्रदीप शर्मा यांची ओळख

एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जाणारे प्रदीप शर्मा हे महाराष्ट्र पोलीस दलातील एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जात असतं. त्यांनी आतापर्यंत 312 गुंडाना ठार केले आहे. त्याचबरोबर यामध्ये अनेक दहशतवाद्यांपासून अंडरवर्ल्डमधील अनेक कुख्यात गुंडाचा समावेश आहे. 1983 साली पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांनी मुंबईत अनेक वर्ष सेवा बजावली.

त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे त्यांना पोलीस उपनिरीक्षकापासून ते थेट पोलीस निरीक्षकापर्यंत बढती मिळाली. 2008 मध्ये एका गुंडांशी असलेल्या कथित संबंधामुळे त्यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले होते. मात्र सबळ पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 2017 मध्ये त्यांना पुन्हा पोलीस दलात घेण्यात आले. मात्र त्यानंतर त्यांनी जास्त काळ सेवा न बजावता आपल्या पदाचा राजीनामा देत आता राजकारणात प्रवेश केला आहे.

You might also like