‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचा निकटवर्तीय भाजपच्या वाटेवर ?

मुंबई : पोलिसनमा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत भाजप शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आतापर्यंत अनेक नेत्यांनी शिवसेना भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता काँग्रेसमधील देखील अनेक नेते पक्ष सोडून जाताना दिसून येत आहेत.

यातच आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आमदार आनंदराव पाटील देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. नुकतीच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.

आनंदराव पाटील हे काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार असून यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो. काल त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास कराड विधानसभा मतदारसंघात राजकीय कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, 13 सप्टेंबर रोजी पाटील आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असून यामध्ये ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने त्यांचा प्रवेश नक्की झाल्याचे बोलले जात आहे.