विधानसभा 2019 : राज्यात 1000 उमेदवार कोट्याधीश, 916 जणांवर FIR दाखल, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभेच्या निवडणूकीत प्रचार चांगलाच रंगला आणि गाजला देखील. आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघाले. प्रत्येक पक्षाने दिलेल्या उमेदवारांची संपत्ती पाहिली तर डोळे दिपून जातील अशी आहे. निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज भरताना शपथपत्र देणे अनिवार्य केल्याने उमेदवारांनी आपल्या शपथपत्रामध्ये आपली खरी माहिती दिली आहे. याच शपथ पत्रांचा अभ्यास असोसिएशन फॉर डेमोक्रेटीक रिफॉर्मस् (ADR) या संस्थेने केला आहे.

ADR या संस्थेने काढलेल्या निष्कर्षावरून राज्यातील 1 हजार उमेदवार कोट्याधीश आहेत. तर 916 उमेदवारांविरुद्ध गुन्हेगारी स्वरुपाचे खटले दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. कोट्याधीश उमेदवारांमध्ये सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार सर्वात जास्त श्रीमंत आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खूपच मागे आहेत. ADR च्या माहितीनुसार 1007 उमेदवार कोट्याधीश आहेत. मागील पाच वर्षात कोट्याधीशांची संख्या घटली असून 2014 मध्ये 1 हजार 95 उमेदवार कोट्याधीश होते.

भाजपने दिलेल्या 162 उमेदवारांपैकी 155 उमेदवार कोट्याधीश आहे. म्हणजेच 96 टक्के उमेदवार कोट्याधीश आहेत. यांनंतर शिवसेनेचा नंबर लागतो. शिवसेनेच्या 124 उमेदवारांपैकी 116 म्हणजेच 94 टक्के उमेदवार कोट्याधीश आहेत. काँग्रेसच्या 147 उमेदवारांपैकी 126 (86 टक्के) उमेदवार कोट्याधीश आहेत. तर राष्ट्रवादीच्या 116 पैकी 101 (87 टक्के) उमेदवार कोट्याधीश आहेत. तसेच 916 म्हणजेच 29 टक्के उमेदवारांवर गुन्हेगारी खटले आहेत.

विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधीक श्रीमंत उमेदवार भाजपचे घाटकोपरचे उमेदवार पराग शहा हे आहेत. त्यांची संपत्ती ही 500 कोटी एवढी आहे. तर दुसरे श्रीमंत उमेदवार मंगलप्रभात लोढा असून ते देखील भाजपचे मलबार हिलचे उमेदवार आहेत. त्यांची संपत्ती 440 कोटी रुपये आहे. यानंतर संजय जगताप हे काँग्रेसचे तिसरे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार असून त्यांची संपत्ती 245 कोटी एवढी आहे.

visit : Policenama.com

You might also like