‘हे’ तिघे मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेतील : गिरीष महाजन

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेना यांच्यात युती होणार हे निश्चित असले तरी जागा वाटपाबद्दलचा तिढा अजून सुटलेला नाही. मुख्यमंत्रीपदावरून मात्र भाजप-सेनेत वाद सुरु आहे. असे असतानाच लोकसभा निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्रीपदाचा अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरलेला आहे असे खळबळजनक वक्तव्य रामदास कदम यांनी केले होते. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चेनंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, त्यामुळे कोणाच्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही अस म्हणत महाजनांनी राम कदम यांचा दावा खोडून काढला आहे.

हे तिघे घेणार निर्णय :
यावेळी महाजन म्हणाले सुभाष देसाई, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात सकारात्मक चर्चा झाली असून या चर्चेला मी उपस्थित होतो. येत्या दोन दिवसात जागा वाटपाबद्दलचा तिढा सुटेल. त्याचबरोबर रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा धागा पकडून मुखमंत्रीपदाबाबत अद्याप निर्णय झाला नसून CM पदाचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे , अमित शहा आणि फडणवीस घेतील असेही त्यांनी सांगितले.

मेगाभरती २ लवकरच :
मेगाभरतीविषयीही महाजन यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. येत्या १० सप्टेंबर नंतर मेगा भरतीच्या दुसऱ्या टप्याला सुरुवात होईल. वेटिंग लिस्टवर असलेल्या काही नेत्यांना आम्ही प्रवेश देणार आहोत. युतीसाठी महाराष्ट्रात भाजप साठी सकारात्मक वातावरण आहे , दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेतले तरच उमेदवार निवडून येतील असं काही नाही. आमच्याकडेही निष्ठावंत नेते व कार्यकर्ते आहेत. त्यांना डावलून चालणार नाही. म्हणून आम्ही प्रवेशाबाबत बंधन घालत आहोत असं जळगाव मध्ये बोलताना महाजन म्हणाले.