धनगर समाजाचा हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा जाहीर

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – इंदापूर तालुक्यातील निमगाव-केतकी येथे आज सोमवारी (दि.7) झालेल्या इंदापूर तालुक्यातील धनगर समाजबांधवांच्या मेळाव्यात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या मेळाव्याला इंदापूर तालुक्यातील धनगर समाज बांधव व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

इंदापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना गावागावातून विक्रमी मताधिक्क्याने देऊन विजयी करण्याचा निर्धार मेळाव्यामध्ये बोलताना धनगर समाजातील सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.

या मेळाव्याला उमेदवार व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काही वेळ उपस्थिती लावून अभ्यासू भाषण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या बहुसंख्य मागण्या मान्य केलेल्या आहेत. तसेच आरक्षण देण्याचा विषय अंतिम टप्प्यात आलेला आहे. जेष्ठ नेते शंकररावजी पाटील यांचे पासून गेली 70 वर्ष आम्ही सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन विकासाचे राजकारण करीत आहोत, हे सर्वांना माहीत आहे. आगामी काळातही तालुक्यातील सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन विकासकामे केली जातील. इंदापूर तालुक्यातील शेतीचा पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवला जाईल.

या वेळी मेळाव्याचे अध्यक्ष व जेष्ठ नेते बाळासाहेब डोंबाळे पाटील, अविनाश मोटे, बाबासाहेब चवरे, माऊली चवरे, रामभाऊ पाटील, माऊली वाघमोडे, भजनदास पवार, रणजित पाटील, ॲड. रामदास नरुटे यांनी मनोगते व्यक्त केली. भाजप सरकारने आदिवासींच्या विविध 22 योजना व विकासासाठी 1000 कोटी रुपये दिल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी इंदापूर तालुक्यातील धनगर समाज हा बाबीर बुवाच्या साक्षीने ठामपणे उभा असल्याचे काही वक्त्यांनी भाषणामध्ये सांगितले.

इंदापूर तालुक्याचे सध्याचे समाजाचे असलेले लोकप्रतिनिधी हे निवडणूक आले की स्वार्थाचे राजकारण करतात. समाजातील जनता त्यांना फसणार नाही. या लोकप्रतिनिधींना निवडणुकीत कर्जत व बारामती मध्ये कोणती भूमिका घेणार हे समाजाला सांगावे, असे आवाहनही भाषणात अविनाश मोटे यांनी केले.

मेळाव्याला विलासराव वाघमोडे, रंगनाथ देवकाते, रामभाऊ पाटील, अशोक इजगुडे, तुकाराम काळे, गजानन वाकसे, जयकुमार कारंडे, संपत बंडगर, विजय चोरमले, महेंद्र रेडके, अंबादास शिंगाडे, भीमराव काळे, प्रताप(नंदू) पाटील, विजय खर्चे, चंद्रकांत पाटील, शिवाजी शिंगाडे, पांडूरंग सावळा शिंगाडे, राजेंद्र चोरमले, अतुल शिंगाडे, सुधाकर करे, शिवाजी तरंगे, सखाराम खारतोडे, दुर्योधन पाटील, माऊली मारकड, नानासो थोरात, विष्णु वाघमोडे, महादेव शेंडगे, निलेश शिंगाडे, बबन खारतोडे, रामस्वरूप तोंडे, अभिमन्यू खटके व भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे तसेच तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अमोल पाटील यांनी केले.

“मामा नुसता मानाचा, मामा नाही कामाचा ! या भाजपचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब चवरे यांनी विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना उद्देशून दिलेल्या घोषणेला उपस्थित धनगर समाज बांधवांनी उस्फूर्तपणे दाद दिली. दरम्यान, कार्यक्रमांमध्ये धनगर समाजाच्या वतीने महादेव पाटील (निमगाव केतकी) यांनी हर्षवर्धन पाटील यांचा काठी व घोंगडी देवून सत्कार केला.

Visit : Policenama.com