इंदापूर विधानसभा मतदार संघात सायं. 5 वाजेपर्यंत 69.43 % मतदान

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – 200-इंदापूर विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रामध्ये आज सकाळी 7 वाजता वरूण राजाच्या साथीने मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. तालुक्यात रात्रभरापासुनच पावसाची रिपरिप चालु असल्याने त्याचा परिणाम मतदानावर नक्कीच होणार हे जाणवत होते. त्यामुळे सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत इंदापूर विधानसभा मतदार संघात जेमतेम मतदान झाले होते. परंतु सकाळी 10 वाजता पावसाने उघडीप दिली आणि हळु-हळु मतदारांची पावले मतदान केंद्रांकडे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वळु लागली. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत इंदापूर विधानसभा मतदार संघात 69.43 %  मतदान झाले आहे. तर आणखी एक तासात सहा वाजेपर्यंत आठ ते दहा टक्के मतदान वाढण्याची शक्यता असुन सहा वाजेपर्यंत सरासरी 80 टक्केच्या आसपास मतदान झाल्याची शक्यता आहे.
Indapur
पावसाच्या उघडीपीमुळे मतदान केंद्रावरील मतदारांची गर्दी वाढू लागल्याचे चित्र असून तालुक्यातील अनेक मतदान केंद्रावर मतदारांना चिखल व साठलेल्या पाण्याचा सामना करावा लागल्याने मतदारांमधून नाराजीचा सुर उमटत होता. तर वयोवृृृद्ध मतदारांची मात्र चांगलीच तारांबळ उडाल्याने सरासरी अनेक मतदारांना समस्यांचा सामना करावा लागला. तर इंदापूर पोलीस स्टेशनच्या वतीने प्रत्येक मतदान केंद्रावर चोख व कडक बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक मधुकर पवार यांनी दिली.
Indapur
राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे यांनी भरणेवाडी येथे आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पत्रकारांशी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की राज्यात राष्ट्रवादी- काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीच्या १६५ जागा निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.
Indapur
तर राज्याचे माजी सहकार व संसदिय कार्यमंत्री व भारतीय जनता पार्टी-मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब बावडा येथे मतदानाचा हक्क बजावला. आज सकाळी ठिक दहा वाजता हर्षवर्धन पाटील यांनी कुटुंबासमवेत त्यांचे बावडा गावी जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन मतदान केले. त्यांचेबरोबर त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील, मुलगी जिल्हा परिषद सदस्या कु. अंकिता पाटील, मुलगा राजवर्धन पाटील यांचेसमवेत मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यामध्ये राज्यात भाजपा व मित्र पक्ष आघाडीचे 230 उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.

Visit  :Policenama.com