ज्येष्ठांसाठी सुविधांना प्राधान्य : चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये सुमारे दीड लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून वर प्राधान्याने धोरणे आखले जातील. इतकेच नव्हे तर राज्यभरातील ज्येष्ठ नागरिकांना आनंददायी, सुरक्षित आणि निश्चिंत आयुष्य जगण्यासाठी नव्याने ज्येष्ठ नागरिक धोरण आखण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीसाठी चंद्रकांत पाटील राज्यव्यापी प्रचार करीत आहे. त्याचप्रमाणे कोथरूड विधानसभा मतदार संघात ते झंझावाती दौरे करीत आहेत. प्रचार फेरी, हाऊस टू हाऊस गाठीभेटी आणि नागरिकांशी ते संवाद साधत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांची ते माहिती देत आहेत. तर हेच विकास पर्व कायम राखण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन ते करीत आहेत.

प्रचारादरम्यान विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांच्याबाबत प्राधान्याने विचार करीत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी आवर्जून सांगितले. कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी नुकताच स्वतंत्र मेळावा देखील आयोजित करण्यात आला होता.

याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून सरकारने नवीन ज्येष्ठ नागरिक धोरणाचा आराखडा आखला आहे. 60 वर्षांवरील नागरिकांना हा दर्जा देण्याची शिफारस यामध्ये करण्यात आली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य निरोगी आणि आनंददायी व्हावे यासाठी अनेकविध धोरणे आखण्यात आली आहेत. अंथरूणाला खिळून राहिलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र, अद्ययावत निवासस्थाने, ज्येष्ठ नागरिकांसाठी शहराजवळच हॉलिडे होम, मोफत बस सेवा आदी विविध योजनांचा त्यामध्ये समावेश आहे. चंद्रकांत पाटील यांच्याशी संवाद साधल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांकडून या उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Visit : Policenama.com