काश्मिर प्रश्न सोडा आणि Patil Occupied Kothrud अर्थात ‘PoK’ बद्दल चर्चा करा : अभिजित मोरेंचे सर्व पक्षांच्या उमेदवारांना ‘आव्हान’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपने चंद्रकांत पाटील यांना कोथरुड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने स्थानिक आणि बाहेरचा असा वाद पेटला. त्यामुळे कोथरुड विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये कोथरुडकरांच्या प्रश्नाची चर्चा करावी यासाठी एकाच व्यासपीठावर खुली चर्चा करावी असे आव्हान आपचे उमेदवार डॉ. अभिजित मोरे यांनी सर्व पक्षांच्या उमेदवारांना दिले आहे.

कोथरुड विधानसभेत स्थानिक प्रश्नांबाबत चर्चा करावी. काश्मिर प्रश्न सोडा आणि Patil Occupied Kothrud अर्थात POK बद्दल चर्चा करा असे अभिजित मोरे यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. कलम 370 ऐवजी लोकांना वीज दरवाढीमुळे वीज बिल 1370 रुपये का येते या बद्दल चर्चा करावी. मनसेने सुद्धा कोथरूडमध्ये स्थानिक व बाहेरच्या वादात स्वतःची पोळी भाजून घेण्याऐवजी कोथरूडकरांच्या समस्यांबद्दल बोलावे. अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्याबद्दल भूमिका स्पष्ट करावी.

भाजपने आज कोथरूड मध्ये कलम 370, काश्मीर, लद्दाख या मुद्द्यांवर खुली चर्चा आयोजित केली आहे. कलम 370 बद्दल कोथरूडच्या निवडणुकीमध्ये चर्चा करून भाजप काय साध्य करू इच्छित आहे ? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी ही निवडणुक कोथरूडची आहे हे विसरू नये. चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मधल्या नागरिकांच्या समस्यांबद्दल बोलावं असं आव्हान आपने दिले आहे. भाजप सरकारला महाराष्ट्रात केलेल्या कामाबद्दल स्वतःवरच विश्वास नसल्यामुळे त्यांना कलम 370,  लद्दाखचे खासदार यांचा आधार घ्यावा लागत आहे. या सर्व वादामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील स्थानिक व बाहेरचा केवळ या मुद्द्यावर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेत आहे. कोथरूडकरांच्या कुठल्याच मुद्द्यावर ठोसपणे भूमिका न घेता, आंदोलन न करता, जनतेच्या मुद्द्यांबद्दल चर्चा न करता केवळ नागरिकांच्या नाराजीचा फायदा स्वतःला मिळावा असा प्रयत्न मनसेचे किशोर शिंदे करत आहेत. त्यांनी कोथरूड मधल्या प्रश्नांची खुली चर्चा करावी असे आव्हान आपने दिले आहे.

कोथरूडमधील शिवसृष्टी प्रकल्प, न्यू बाणेर पाषाण लिंक रोड प्रकल्प लिंक रोड प्रकल्प, नदी सुधार प्रकल्प, चांदणी चौकातील वाहतूक प्रकल्प हे सर्व प्रकल्प रखडलेले आहेत. बाणेर, बालेवाडी परिसरामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न तीव्र बनलेला आहे. पुणेकर सरकारला भरपूर कर देतात परंतु या कराच्या मोबदल्यामध्ये कोथरूड विधानसभेतील जनतेला वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, नालेसफाई, चांगलं पर्यावरण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या सेवा पुरवण्यांमध्ये सरकारला अपयश आले असल्याचा आरोप आपने केला आहे. इथल्या जनतेच्या प्रश्नावर ही निवडणूक लढवली जावी असे मत आपचे उमेदवार डॉ. अभिजित मोरे यांनी व्यक्त केले आहे.

Visit : Policenama.com