सोलापूरमध्ये राष्ट्रवादीला ‘धक्‍का’ ?, विद्यमान आमदारांची मुलाखतीला ‘दांडी’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे आज सोलापूरमध्ये इच्छूकांच्या मुलाखती घेण्यासाठी आले आहेत. अजित पवार यांच्या या बैठकीला सोलापूर जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदरांनी पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी अजित पवार घेत असलेल्या इच्छूकांच्या मुलाखतीसाठी जाण्याचे टाळले आहे. तसेच मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम हे जेलमध्ये आहेत तर माळशिरसचे आमदार हनुमंत डोळस यांचे निधन झाले आहे. सोपल आणि शिंदे या दोन आमदारांनी बैठकीला दांडी मारल्याने त्यांच्या पक्षांतरांच्या चर्चेला उधाण आले आहे.

माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे हे भाजपाकडून इच्छूक असल्याची चर्चा तालुक्यात आहे. तर दिलीप सोपल हे पक्षातून बाहेर पडणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर हे दोन आमदार राष्ट्रवादीच्या मुलाखतीसाठी गेले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे दिग्गज नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला. तर विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीला माढ्याची जागा गमवावी लागली होती.

आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चार नेते शिवसेना-भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके, राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार रमेश कदम आणि काँग्रेसचे अक्कलकोटचे विद्यमान आमदार सिद्धराम म्हेत्रे हे पक्षांतर करणार असल्याची चर्चा आहे.

आरोग्यविषयक वृत्त