‘या’ दोन दिग्गज नेत्यांपैकी एकजण शिवसेनेत तर दुसरे भाजपमध्ये प्रवेश करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठे नेते पक्षांतर करत असून आतापर्यंत अनेक नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर देखील अनेक मातब्बर नेते पक्षप्रवेशासाठी रांग लावून आहेत. यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि भाजपच्या तिकिटावरील राज्यसभा खासदार नारायण राणे हेदेखील पक्षबदल करणार आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या दोन नेत्यांकडे लागले आहे.

छगन भुजबळ आणि नारायण राणे हे दोघेही पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, मात्र काही कारणाने दोघांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. छगन भुजबळ यांनी 28 वर्षांपूर्वी शिवसेना सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये गेले. त्यानंतर मागील 20 वर्ष ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. मात्र आता ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्याचबरोबर नारायण राणे यांनी 2005 मध्ये सेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र दोन वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यांना भाजपमध्ये प्रवेश करायचा होता. मात्र काही कारणांमुळे त्यांचा प्रवेश रखडला आणि त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. मात्र आता विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने दोन्ही नेत्यांनी पक्षबदल करण्याचे ठरवले आहे. त्याप्रमाणे नारायण राणे हे भाजपमध्ये तर छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा असल्या तरी त्याची अधिकृत माहिती मात्र भुजबळांकडून देण्यात आलेली नाही. मात्र नारायण राणे हे 1 सप्टेंबरला भाजपमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश करणार आहेत. दरम्यान, या दोघांच्या राजकीय पक्षबदलामुळे महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळे वळण मिळणार असून भविष्यात याचे परिणाम दिसून येतील.

आरोग्यविषयक वृत्त –