राष्ट्रवादीच्या ‘आऊटगोईंग’वर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ‘ही’ प्रतिक्रिया, जाणून घ्या

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्या जोरदार गळती सुरु आहे. पक्षातील अनेक आजी माजी पदाधिकारी पक्षाला राम राम करत सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. काही जण ईडीला घाबरून गेले, काहीजण बेडीला घाबरून गेले तर काहीजण “सीडी “ला घाबरून गेले. ज्यांच्या मागे चौकशी लागली ते जाताय.

ज्यांचा घोटाळा असेल तो जातोय. दमदाटीला घाबरणारे जात आहेत,  छत्रपतीच्या विचाराने आणि ताकदीने चालणारा एकाही मावळा शरद पवार साहेबांना सोडून जात नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीतील गळतीवर उत्तर दिले आहे. तसेच यावेळी पाटील यांनी संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहनही केले.

राष्ट्रवादी सोडून जे जे नेते गेले त्यांच्या भानगडी विधानसभा निवडणुकीत सांगतो. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांमुळे राष्ट्रवादी पक्ष स्वच्छ व्हायला लागला आहे. घाबरट लोकांपेक्षा तरुण राष्ट्रवादीत येत आहेत. त्यांना सोबत घेऊन पवार साहेबांच्या विचारातून नवा महाराष्ट्र घडवू,  असे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

बीडमध्ये शिव स्वराज्य यात्रेच्या जाहीर सभेत जयंत पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ.अमोल कोल्हे, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार सतिष चव्हाण, आमदार विक्रम काळे, माजी मंत्री प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आदी पदाधिकारी उपस्थतीत होते.