विश्व पर्यटनाच्या नकाशावर पुढील काळात तुळजापूर नक्की : अमित शहा

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद घेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. तोच स्वराज्याचा वारसा नरेंद्र मोदी तुळजाभवानी देवीच्या कृपाशीर्वादाने पुढे नेत आहेत. राज्यात पुन्हा एकदा पूर्ण बहुमताचे भाजपा सरकार सत्तेत येईल. त्यासाठी तुळजापूरकरांच्या आशीर्वादाची गरज आहे. विश्व पर्यटनाच्या नकाशावर पुढील काळात तुळजापूर नक्की असेल, असे अभिवचन आपणांस देतो, अशा शब्दात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तुळजापूरकरांच्या मनाला साद घातली.

महायुतीचे तुळजापूर विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेला ते संबोधित करीत होते. यावेळी मंचावर भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंधारणमंत्री तानाजी सावंत, माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, सुधीर पाटील, अ‍ॅड. मिलींद पाटील, देवानंद रोचकरी, रोहन देशमुख, सेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शामल वडणे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मागील पाच वर्षांत देशात आणि राज्यात भाजपाने भ्रष्टाचारमुक्त स्थिर सरकार दिले आहे. तेराव्या वित्त आयोगातून मागील काँग्रेस सरकारने महाराष्ट्राला केवळ 1 लाख 15 हजार कोटी रूपयांचा निधी दिला होता. मोदी सरकारने मागील पाच वर्षांत महाराष्ट्राला तब्बल 4 लाख 38 हजार कोटी रूपयांचा भरीव विकासनिधी देवू केला आहे आणि प्राप्त झालेला हा निधी अत्यंत जबाबदारीने अजिबात गैरव्यवहार अथवा भ्रष्टाचार न करता तो देवेंद्र फडणवीस यांनी सत्कारणी लावला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार नक्की स्थापन होईल, असा आशावादही शहा यांनी व्यक्त केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने घराणेशाहीचे राजकारण करीत आले आहे. त्याला गाढून टाकण्यासाठी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून राणाजगजितसिंह पाटील यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहनही शहा यांनी केले.

पुढील पाच वर्षांत तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर येईल. वॉटरग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर केली जाईल. उस्मानाबाद आणि परिसरातील जलसंकट दूर करण्यासाठी कृष्णा मराठवाडा प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. एकीकडे 370 कलम हटवून देशाच्या सुरक्षिततेची काळजी घेणारे हे सरकार सामान्य जनतेच्या विकासासाठी कटीबध्द असल्याचे शहा यांनी सांगितले. देशासाठी तुळजाभवानी देवी प्रेरणास्थान आहे. त्यामुळे काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत तुळजापूरचा नावलौकिक होणे गरजेचे आहे. त्याकरिता जागतिक पर्यटनाच्या साखळीमध्ये तुळजापूरचा समावेश करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याचे अमित शहा यांनी स्पष्ट केले. आपल्या आक्रमक शैलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समाचार घेत असताना त्यांनी राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यावर जोरदार शब्दप्रहार केले. देशाच्या सुरक्षिततेला दुय्यम स्थान देवून अतिरेकी आणि फुटीरतावाद्यांना समर्थन देणार्‍या काँग्रेस, राष्ट्रवादीला पुन्हा एकदा पराभूत करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

आलुरे, सोनटक्के यांचा भाजपप्रवेश
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अ‍ॅड. दीपक आलुरे व शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटक्के यांनी सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला. शिवसेनेचे संपर्कप्रमुख तानाजी सावंत मंचावर असतानाच शिवसैनिकांनी त्यांना जय महाराष्ट्र करीत भाजपाचे कमळ हाती घेतले आहे.

Visit : Policenama.com