कॅन्टोन्मेंटमध्ये कमळाचे ‘हात’ मजबूत

जानज्योत, शेट्टींच्या प्रवेशामुळे वाढली भाजपची ताकद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चितता कायम असते हे खरे असले तरी अनेकदा नाट्यमय घडामोडींमुळे मतदानाआधीच काही बाबी निश्चित होत असतात. काँग्रेसच्या सदानंद शेट्टी आणि सुधीर जानज्योत या तगड्या नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात कमळाचे हात मजबूत झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी भाजपच्या नेत्यांशी चर्चेनंतर या दोघांचाही प्रवेश निश्चित झाला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे, माजी मंत्री दिलीप कांबळे, पक्षाचे सरचिटणीस गणेश बीडकर यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या दोघांच्या भाजप प्रवेशात पक्षाचे सरचिटणीस गणेश बीडकर यांचा सिंहाचा वाटा आहे.

सुधीर जानज्योत हे मेहतर समाजातील असून गेली 25 वर्षे राजकारणात सक्रिय आहेत. त्यांचा त्यांच्या समाजासोबतच दलित, मागासवर्गीय समाजात चांगला संपर्क आहे. महापालिका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, नगरसेवक, महापालिकेच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले आहे.

सदानंद शेट्टी हे देखील कॅन्टोन्मेंटच्या परिसरातील वजनदार राजकीय नेते. नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष अशी पदे भूषवीत त्यांनीही अडीच दशकांची कारकीर्द गाजवली आहे. त्यांच्या पत्नीही विद्यमान नगरसेविका आहेत. शेट्टी हे त्यांच्या कामामुळे या परिसरातील झोपडपट्टी भागात सुपरिचित आहेत.

सुमारे 3000 घरांचा सदानंदनगर हा एसआरएचा प्रकल्प त्यांनी यशस्वीपणे राबविला आहे.

.जानज्योत आणि शेट्टी यांच्या प्रवेशामुळे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भाजपची पकड आणखी मजबूत झाली आहे. यामुळे आताच्या निवडणुकीत येथील भाजपच्या मतदानात किमान 15000 मतांची वाढ होईल. पक्षसंघटना व्यापक बनण्यासाठीही त्याचा फायदा होणार असल्याचे भाजपचे सरचिटणीस गणेश बीडकर यांनी सांगितले. तर

काँग्रेसच्या दोन जुन्याजाणत्या नेत्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची आणि महायुतीची ताकद वाढली आहे. याचा मतांमध्ये वाढ होण्यास फायदा होईल. मेहतर समाज भाजपच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे म्हणाले. सुधीर जानज्योत म्हणाले, गेली अनेक वर्षे काँग्रेस पक्षात काम केले. परंतु आमच्या समाजाच्या स्थितीत मोठा फरक पडला नाही.

समाजाच्या अनेक समस्या अजूनही प्रलंबित आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली योग्य न्याय मिळू शकेल अशी आशा आहे. माजी नगरसेवक सदानंद शेट्टी यावेळी म्हणाले की, झोपडपट्टी भागात राहणाऱ्या लोकांसाठी अनेक वर्षे काम करत आहे. या अत्यंत गरीब लोकांसाठी मोदींच्या नेतृत्त्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारने थेट लाभाच्या योजना राबवल्या आहेत. त्यामुळे या गरीबांना दिलासा मिळाला आहे. म्हणूनच पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like