विधानसभा 2019 : पुण्यात शिवसेना शहर प्रमुखांनी मागितल्या 4 जागा, जाणून घ्या ‘त्या’ कोणत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील तीन महिन्यापासून शिवसेनेचे पुण्यातील शहर प्रमुखपद रिक्त होते. या रिक्त पदावर संजय मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर प्रमुखपदी नियुक्ती होताच संजय मोरे यांनी पुण्यातील 8 पैकी 4 जागांची मागणी केली आहे. राज्यात भाजप-शिवसेना युती होणार की नाही याबाबत शंका असून पुण्यातील शिवसेनेच्या इच्छूक उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.

शिवसेनेने पुण्यातील दोन्ही शहर प्रमुखांना डच्चू दिला होता. चंद्रकांत मोकाटे आणि महादेव बाबर यांना पदावरून काढल्यानंतर भाजपने माधुरी मिसाळ यांची शहर अध्यक्षपदी निवड केली. माधुरी मिसाळ यांनी निवड झाल्यानंतर पुण्यातील सर्वच्या सर्व 8 जागा भाजप लढवणार असल्याचे सांगत शिवसेनेवर कुरघोडी केली. मात्र आता संजय मोरे यांची शहराध्यक्षपदी निवड करून शिवसेना देखील निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे.

शिवसेनेने कोथरुड, हडपसर, वडगावशेरी आणि शिवाजीनगर या चार मतदारसंघावर दावा केला आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यात शिवसेनेच्या विशाल धनवडे यांनी प्रचाराचा नारळ फोडून प्रचार सुरु केला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मस्थान असलेल्या पुण्यात शिवसेनेची ताकद आहे. मात्र, भाजपच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे आणि पक्षांतर्गत दुफळी यामुळे पक्षाची ताकद कमी झाली आहे.
Visit – policenama.com