निवडणुकीच्या वेळी ‘फोन-टॅपिंग’चे प्रमाण वाढले

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन – राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशा वातावरणात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज्य सरकार हे विरोधकांची हेरगिरी करत आहे असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. कधी नव्हे ते या निवडणुकीच्या वेळी फोन-टॅपिंगचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारवर निशाणा साधताना शरद पवार म्हणाले, विरोधकांची मुस्कटदाबी करणं, त्यांना नामोहरम करण्यासाठी साम-दाम-दंड-भेद या धोरणाचा वापर सरकार करत आहे. महाराष्ट्राचं राजकारण कधीच एवढ्या खालच्या पातळीवर गेलं नव्हतं असं मतही त्यांनी व्यक्त केले. सरकारकडून पाळत ठेवली जात आहे. एखाद्याने मदत करा असा फोन केला तर त्यांच्या घरी रात्री ईडीचे पथक दाखल होते असे सांगत त्यांनी सत्ताधारी पक्ष ‘ईडी’चा पुरेपूर वापर करून घेत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

ईडीच्या नोटीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, कुठलाही सहभाग नसताना ईडी ची नोटीस मला मिळाली. त्यामुळे उलट जनजागृती झाली. विरोधकांवर दबाव आणण्यासाठी सीबीआय, ईडी यांसारख्या संस्थांचा वापर केला जात असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक राजकीय नेतेमंडळींना ईडीची नोटीस आल्या आहेत. फोन टॅपिंग केल्याशीवाय या गोष्टी समजू शकत नाही असंही ते म्हणाले.

Visit : Policenama.com