पंढरपूर, करमाळा, चिंचवड, भोसरी आणि सांगोल्यात राष्ट्रवादीची ‘डोकेदुखी’, कार्यकर्ते संभ्रमावस्थेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत काल संपली. त्यामुळे आता कोणाविरुद्ध कोण असे चित्र स्पष्ट झालेले आहे. युती विरोधात आघाडी अशी थेट लढाई जरी असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट वाटप आणि ए बी फॉर्म वाटपात घोळ झाल्यामुळे अनेक ठिकाणी राष्ट्रवादीला अपक्ष उमेदवाराला पाठींबा द्यावा लागत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणची राजकीय गणितं आता बदलू लागली आहेत. एक आढावा सध्या राजकीय गणित बदलत असलेल्या मतदारसंघांवर.

1. पंढरपूर – कॉंग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादीने उमेदवार दिल्याने चिडून कॉंग्रेस नेत्यांनीही पंढरपूरमध्ये कॉंग्रेस उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे या जागेवरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमधील वाद आता शिगेला पोहोचला आहे. महायुतीने राजकारणातील मुरब्बी सुधाकर परिचारकांना उमेदवारी देत विरोधी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. परिचारकांच्या विरोधात कॉंग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेल्या आमदार भारत भालकेंना उमेदवारी दिली आहे.

2. करमाळा – करमाळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने संजय पाटील यांना अधिकृत उमेदवारी दिली. मात्र, त्यांना मतदान करू नका. तर अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना मतदान करा, असे खुद्द राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादीच्या निर्णयात सतत बदल होत असल्यामुळे या ठिकाणचे कार्यकर्ते चांगलेच गोंधळात पडलेले आहेत.

3. चिंचवड – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. पक्षाचा अधिकृत AB फार्म नसल्याने आघाडीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला. त्यामुळे या मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला आहे. ए बी फॉर्म वाटपात घोळ झाल्यामुळे एकेकाळच्या आपल्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला अपक्ष उमेदवाराला पाठींबा द्यावा लागला आहे.

4. भोसरी – भोसरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी पक्षाच्या तिकीटावर न लढता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या एका स्थानिक नगरसेवकानेही या मतदारसंघातून अपक्ष लढण्याचाच निर्णय घेतला. मात्र अखेरच्या क्षणी या नगरसेवकाला माघार घेण्यास सांगून राष्ट्रवादीने आता विलास लांडे यांना पुरस्कृत केलं आहे.

5. सांगोला – आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शेकापला सोडली. त्यामुळे नाराज झालेले राष्ट्रवादीचे नेते दीपक साळुंखे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. यामुळे इथेही राष्ट्रवादीऐवजी शेकापला मतदान करा, असे सांगण्याची वेळ राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे.

Visit : Policenama.com