राजू शेट्टींना पुन्हा मोठा धक्का ! स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी आज शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या जिल्हाध्यक्ष संगीता खाडे यांनीही भाजपात प्रवेश केला. कोल्हापूरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या महायुती मेळाव्यात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भगवान काटे यांच्या भाजप प्रवेशामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला धक्का बसला आहे.

याआधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते, तसेच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी संघटनेच्या अध्यक्षपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी भाजप प्रवेश केला आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शेट्टी यांना मोठा फटका बसला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्थापनेपासून भगवान काटे हे या संघटनेत होते. भगवान काटे हे दीर्घकाळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. ऊस दराबाबत राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात झालेल्या अनेक आंदोलनांमध्ये काटे यांनी सहभाग घेतला होता. संगीता खाडे या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्या होत्या. तसेच राष्ट्रवादीच्या महिला शाखेच्या जिल्हाध्यक्ष होत्या. अलीकडेच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता.

Visit : Policenama.com