भाजपला घालवल्याशिवाय म्हातारा होणार नाही : शरद पवार

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेचे घमासान सध्या जोरात सुरु आहे, सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष शिगेला पोहचला आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रचारसभा घेतली. यावेळी ते म्हणाले, सत्ताधारी अपप्रचार करतायेत की या वयातही मला प्रचारात उतरावे लागत आहे मात्र मी सत्ताधाऱ्यांना सांगू इच्छितो की मी अजून तरुण आहे आणि जोपर्यंत मी सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या या भाजपचे सरकार घालवत नाही तोपर्यंत म्हातारा होणार नाही.

प्रचारसभेदरम्यान शरद पवारांनी सत्ताधारी भाजपवर चांगलाच निशाणा साधला, सर्व क्षेत्रांत अपयशी ठरलेल्या या सरकारने चक्क सैनिकांनाही सोडले नाही. त्यांच्या शौर्याचा वापरसुद्धा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी केला असा घणाघात पवार यांनी यावेळी केला आहे. बाळापूर मतदारसंघात वाडेगावात राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम गावंडे, मूर्तिजापुरात रविकुमार राठी तर वाशीम जिल्ह्यातील मानोरा येथे कारंजा मतदारसंघातील प्रकाश डहाके यांच्या प्रचारार्थ सोमवारी पवार यांनी सभा घेतल्या.

इंदिरा गांधी यांनीही पाकिस्तानशी युद्ध केले होते मात्र त्यांनी जिंकलेल्या सैनिकांचे श्रेय कधीच घेतले नाही तसेच नोटबंदी, जीएसटी हे मुद्दे सुद्धा सर्वसामान्यांची फसवणूक करणारे असल्याचे रोखठोक मत शरद पवार यांनी यावेळी मांडले.

शेतकऱ्यांना कर्जमाफी नाहीच –
प्रचार सभेदरम्यान पवारांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच हल्लाबोल केला. पवार म्हणाले, शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत मात्र अजूनही राज्यातील ६१ टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. यवतमाळ येथील एका शेतकरी कुटूंबाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. विशेष म्हणजे या कुटुंबियांना पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसह अर्ध्या मंत्रिमंडळाने भेट दिली होती. त्यामुळे अशा अकार्यक्षम सरकारला खुर्चीवरून खाली खेचायला हवे असे परखड मत यावेळी शरद पवारांनी व्यक्त केले.

Visit : Policenama.com