युतीच्या आधीच बीडमध्ये ‘सेने’च्या बड्या नेत्याची ‘बंडखोरी’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना-भाजप युतीचे काही जागांवरून भीजत घोंगडे आहे. बीडमध्ये शिवसेना-भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याआधीच शिवसेनेच्या बड्या नेत्याने बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या या बड्या नेत्याने अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्याने युती होण्याआगोदरच बंडखोरांची डोकेदुखी वाढली आहे.

शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपाचे घोडे आडले असून यातून मार्ग काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहेत. युतीची यादी जाहीर होण्याआगोदरच बीड जिल्ह्यातील शिवसेनेच्या एका बड्या नेत्याची क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये हा नेता आपल्या कार्यकर्त्याला अपक्ष लढणार असल्याचे सांगत आहे. व्हायरल क्लिपमुळे बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. तर यादी जाहीर होताच अनेक नेते बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. युतीमध्ये ही जागा भाजपच्या वाट्याला जाऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेकडून बंडखोरी करण्याची तयारी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी सुरु केली असून तसा निरोप त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये बदामराव पंडीत हे आपल्या कार्यकर्त्याशी मोबाइलवर संवाद साधताना आपल्याला तिकीट मिळाले नसल्याचे सांगत आहेत. ही क्लिप गेवराईमध्ये प्रचंड व्हायरल झाली आहे. सध्या गेवराईमध्ये भाजपचे लक्ष्मण पवार हे विद्यमान आमदार आहेत. या निवडणुकीत ही जागा भाजपला सुटल्यास या ठिकाणी बंडखोरी होऊन याचा परिणाम युतीच्या उमेदवारावर होऊ शकतो.

काय म्हणाले बदामराव पंडीत ?
व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये बदामराव एका कार्यकर्त्यांला उद्देशून म्हणतात की ‘आपल्याला तिकिट मिळालं नाही बरका ! आता आपल्याला अपक्ष लढावे लागेल. सांग तसं तू सर्वांना…’ असे म्हणून बदामराव पंडितांना आपल्या कार्यकर्त्याला कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत..

कोण आहेत बदामराव पंडीत ?
बदामराव पंडीत यांनी 1995, 1999 आणि 2009 च्या निवडणुकीत अनुक्रमे अपक्ष आणि राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. यामध्ये ते विजयी झाले होते. तसेच त्यांनी मंत्रीपद भूषवले आहे. मात्र, 2014 निवडणुकीमध्ये त्यांचा 45 हजार मतांनी पराभव झाला होता. 2017 मध्ये शिवसेनेत प्रवेश करून त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चार जागा जिंकल्या होत्या. पंडीत यांनी बंडखोरीचे निशाण उपसल्याने गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित, भाजपचे लक्ष्मण पवार आणि अपक्ष बदामराव पंडित यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे बोलले जात आहे.

Visit : policenama.com