भाजपच्या ‘या’ 2 बंडखोर नेत्यांमुळे क्षीरसागरांची ‘डोकेदुखी’ ! बीडमध्ये भाजप-शिवसेनेत ‘कोल्ड’ वॉर ?

बीड : पोलीसनामा ऑनलाईन : विधानसभा निवडणुकीसाठी पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर अर्ज भरणे, कागदपत्रांची तपासणी इत्यादी आयोगाची अधिकृत प्रक्रिया पूर्ण झाली असून आता खऱ्या अर्थाने लढाईला सुरुवात झाली. आपापले प्रतिस्पर्धी निश्चित झाल्यानंतर नेत्यांनी दंड थोपटायला आणि डाव टाकायला सुरुवात केली आहे. मागील निवडणुकीत वेगवेगळे लढल्यानंतर मित्रपक्षांमधील स्थानिक नेत्यांचे मतभेद आता उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. याचे बीड मतदारसंघ एक चांगले उदाहरण देता येईल. या मतदारसंघात शिवसेनेसमोर भाजपच्या दोन बंडखोर नेत्यांचे ‘बंड’ थंड करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

असे आहे प्रकरण :
भाजपचे दोन नेते राजेंद्र मस्के आणि अ‍ॅड.गोविंद नवनाथ शिराळे यांनी पक्षाशी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यामुळे शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या समस्येत मोठी वाढ झाली आहे. अ‍ॅड. गोविंद नवनाथ शिराळे हे भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ शिराळे यांचे चिरंजीव आहेत तर राजेंद्र मस्के हे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांचे जयश्री मस्के यांचे पती आहेत. हे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने क्षीरसागर यांच्या विजयात मोठे अडथळे निर्माण झाल्याचे दिसत आहे.

ऐनवेळी या नेत्यांनी असा पवित्र घेतल्यानंतर शिवसेना आणि जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यात यावेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत मात्र या दोनही नेत्यांनी यास साफ नकार दिला असून क्षीरसागर यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. उद्या सोमवारी (ता.७) विधानसभेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून त्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल. पुढील घडामोडींकडे सर्वांचेच लक्ष लागून राहीले आहे.

भाजप-शिवसेना कोल्ड वॉर ?
दरम्यान या घडामोडीमागचे कारण वेगळेच असल्याचे दिसत आहे. गेवराई मतदारसंघातील जागा शिवसेनेकडे आहे तथापि शिवसेनेचे बदामराव पंडित यांनी बंडखोरी करत याठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे भाजपच्या विद्यमान आमदारची जागा धोक्यात आली आहे. यालाच प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या म्हस्के आणि शिरोळे या नेत्यांनी बीडमधील शिवसेना उमेदवाराला अडथळे निर्माण करण्यास सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे. आता भाजप-शिवसेना नेत्यांमधील हे कोल्ड वॉर कोणत्या टप्प्यावर थांबते ते पाहणे औत्सुक्याचे आहे.

Visit : Policenama.com