पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर ‘जादूटोणा’ केल्याचा माजी आमदाराचा आरोप, कोकणात ‘खळबळ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विधानसभा निवडणूक तोंडावर असताना आता कोकणात मात्र शिवसेनेत अंतर्गत वाद पेटला आहे. शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केला की, ते भगतगिरी करत असून जादूटोणा करण्यासाठी बंगाली बाबांना सोबत घेऊन फिरत असतात.

दळवींची हकालपट्टी करण्यासाठी प्रयत्न –

दरम्यान रामदास कदम यांनी प्रतिक्रिया देताना दळवींवर हल्लाबोल केला. दळवींची सेनेतून हकालपट्टी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कदम म्हणाले. दळवींचे हे विधान मी गंभीर्यांने घेतले असून त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे कदम म्हणाले. कावीळ झालेल्या माणसाला जग पिवळेच दिसते असा खोचक टोला कदम यांनी दळवींना हाणला. त्यांना सगळीकडे रामदास कदम दिसतात. माझ्यावर त्यांनी केलेल्या आरोपामुळे मी त्यांच्यावर 10 कोटी रुपयांचा दावा दाखल करणार असल्याचे ते म्हणाले.  
 
सूर्यकांत दळवींचा रामदास कदम यांच्यावर आरोप –
सूर्यकांत दळवी म्हणाले की, रामदास कदम हे भगत आणि जादूटोणा करणारे आहेत. दर अमावस्येला ते भगतगिरी करतात. ते बंगाली बाबांना घेऊन फिरतात. त्यांनी विरोधी पक्ष नेता बनण्यासाठी आमच्याबरोबर भगत पाठवला होता. कदम यांनी दापोली विधानसभा मतदार संघात घुसखोरी करु नये असे देखील दळवी म्हणाले.

कदम यांनी पक्षाच्या विरोधात काम केल्याचा पुरावा आपल्याकडे असल्याचा आरोप देखील दळवी यांनी केला. या मतदार संघात पक्षासाठी योगदान देणारा नेता उमेदवार हवा, कदम यांनी पराभव झालेल्या मतदार संघातून  निवडणूक लढवावी असा खोचक टोमणा देखील दळवींनी कदम यांना मारला.