शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात रंगणार आजी आणि माजी आमदारांत ‘बीग फाईट’

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले असून येथे आजी व माजी आमदारांत सरळ फाईट होणार आहे. विधानसभेच्या 198 व्या मतदार संघात एकुण दहा जण निवडणूक रिंगणात उतरले असून पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. या दहा उमेदवारामध्ये भाजप कडून विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे, राष्ट्रवादी काँग्रेस कडून माजी आमदार अशोक पवार, मनसेचे कैलास नरके, बहुजन समाज पार्टीचे रघुनाथ भवार, बहुजन मुक्ती पार्टीचे अमोल लोंढे, वंचित बहुजन आघाडीचे चंदन सोंडेकर, संभाजी ब्रिगेड पार्टीचे चंद्रशेखर घाडगे, तसेच अपक्ष म्हणून नरेंद्र वाघमारे, नितीन पवार, सुधीर पुंगलीया हे निवडणूक रिंगणात आहेत.

आज अर्ज मागे घेण्याचा दिवस असल्याने याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते की नेमके काय चित्र या मतदार संघात असणार. कारण राष्ट्रवादी काँग्रेस व युतीमध्ये बंडाळी झाल्याने प्रमुख उमेदवार अडचणीत आले होते परंतु शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी युती धर्म पाळत आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला व सर्व शक्तीनीशी शिवसेना भाजपचे उमेदवार बाबुराव पाचर्णे यांच्या समवेत खंबीरपणे उभी राहिल असे स्पष्ट केले. तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला असून लवकरच भाजप पक्ष प्रवेश करणार असून आमदार बाबुराव पाचर्णे यांना भरघोस मताधिक्य मिळवून देण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. या सर्व घडामोडी नंतर या मतदार संघातील निवडणूकीचे संपुर्ण चित्र बदलून गेले आहे.

आमदार बाबुराव पाचर्णे यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकास कामाच्या जोरावर मतदारांना मत मागत आहेत.तर माजी आमदार अशोक पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामाबरोबरच सध्याच्या परिस्थिती, असलेल्या अडचणी यावर बोट दाखवत मतदारांना आवाहन केले आहे. हे सगळं असल तरीही या मतदार संघातील पदाधिकारी किती ताकदीने यात उतरतील यावर निकाल अवलंबून आहेत.

Visit : Policenama.com