पुणे: Maharashtra Assembly Election 2024 | सध्या दिवाळी सुरु असल्याने विधानसभा निवडणुकीचा प्रचार थंडावला आहे. निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची मुदत ४ नोव्हेंबर आहे. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार खऱ्या अर्थाने ५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
२० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर प्रचार १८ नोव्हेंबरला संपणार आहे. परिणामी प्रचारासाठी अवघे १४ दिवस मिळत आहेत. या कालावधीत दोनच रविवार मिळणार आहेत. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांना प्रचाराचे सूक्ष्म नियोजन करावे लागणार आहे. प्रचार रॅली आणि नेत्यांच्या जाहीर सभा कुठे घ्यायच्या याचे वेळापत्रक करावे लागणार आहे.
सर्वपक्षीय उमेदवार सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झाले आहेत. या माध्यमातून प्रचार केला जात आहे. आचारसंहिता लागू असल्याने सोशल मीडियावर प्रचार करताना आयोगाने घातलेल्या अटी, शर्तीचे पालन उमेदवारांना करावे लागणार आहे.