Maharashtra Assembly Election 2024 | मतदानाचा टक्का वाढविण्याच्यादृष्टीने मतदान केंद्रावरील सुविधांबाबत व्यापक जनजागृती करा – जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

Maharashtra Assembly Election 2024 | In order to increase the voting percentage, spread awareness about the facilities at the polling station - Collector Dr. Suhas Diwase

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्याच्यादृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रितरित्या प्रयत्न करावेत; मतदारांना मतदान केंद्रावर उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे (Suhas Diwase) यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसोबत मतदार जनजागृती मोहिमेबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, निवडणूक निरीक्षक मानवेश सिंह सिद्धू, ललीत कुमार, भीम सिंह, अरुंधती सरकार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, निवडणूक पोलीस निरीक्षक राजेश सिंह, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी., उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर, जिल्हा स्वीप समन्वयक अधिकारी अर्चना तांबे उपस्थित होत्या. तसेच निवडणूक निरीक्षक पीगे लिगू, नाझीम झई खान, गार्गी जैन, एम गौतमी, संजीव कुमार, के हिमावती दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना, पाणी, व्हीलचेअर, बसण्याकरीता बाकडे, मंडपाची व्यवस्था, स्वच्छतागृह, वाहनतळ आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या सुविधांची माहिती मतदारांना होण्याकरीता व्यापक जनजागृती करा. मतदान केंद्रावर होणारी गर्दी टाळण्याकरीता केंद्राबाहेर मोठ्या आकाराची कलर कोडिंग किंवा बहुरंगी ध्वजाकिंत करावेत. मतदारांकरीता वाहनतळांची सुविधा करण्यात आली असून त्याबाबत सूक्ष्म नियोजन करुन माहिती मतदारांपर्यंत पोहचवावी. याबाबबत पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनी त्यांच्या संकेतस्थळ, मोबाईल ॲप, एफएम स्टेशन तसेच मनपाच्या समाजमाध्यमाद्वारे जनजागृती करावी. मतदारांना मतदान करताना कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, याबाबत सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी.

मतदानाचा टक्का वाढविण्याकरीता जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. मुकबधीर मतदारांकरीता हेल्पलाईनची सोय करण्यात आली आहे. ‘आजी, आजोबा, आई-बाबा मतदानाला चला’ अशी आवाहनाची मोहीम, पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मतदारांना आवाहन, 50 टक्क्यापेक्षा कमी मतदान झालेल्या क्षेत्रात जनजागृती, मतदान केंद्र जाणून घ्या, असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. बदलेल्या मतदान केंद्राबाबत परिसरातील मतदारांना माहिती, विविध गृहनिर्माण सोसायटीद्वारे मतदारांना तसेच औद्यागिक क्षेत्रातील कामगारांना मतदानाबाबत आवाहन करण्यात येत आहे, असेही डॉ. दिवसे म्हणाले.

निवडणूक निरीक्षक श्री. सिद्धू म्हणाले, मतदान केंद्रावर गर्दी टाळण्यासोबत उंचीवर दिशादर्शक फलक (सायनेज) तसेच प्रतिक्षालयाची व्यवस्था करावी. मतदारांच्या वाहनांकरीता असलेल्या वाहनतळाची माहिती मतदारांपर्यंत पोहचवावी. मतदान केंद्रावर पाण्याची व्यवस्था करावी. मतदान केंद्रावरील सुविधेबाबत पत्रकार परिषद घेवून संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माध्यमांना माहिती द्यावी.

निवडणूक निरीक्षक श्री. सिंह म्हणाले, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात भारतीय सैन्यदलाचे दक्षिण मुख्यालय तसेच अन्य आस्थापना आहेत, त्यांच्याशी संपर्क करुन मतदान करण्याबाबत आवाहन करावे. मतदान केंद्रावरील गर्दी टाळण्याकरीता पुरुष व महिला अशा रांगा करण्यात याव्यात. मतदान केंद्रावर आवश्यकतेप्रमाणे स्वयंसेवकांची नियुक्ती करावी. मतदान केंद्रावरील शौचालयाची साफसफाई करावी, असेही ते म्हणाले.

डॉ. भोसले म्हणाले, मतदानाचा टक्का वाढविण्याकरीता शहरात गृहनिर्माण संस्था, ज्येष्ठ नागरीक संघ, हास्य क्लब, विविध सामाजिक घटकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्यात येत आहे. मतदानापूर्वी उद्यानांमध्ये येणाऱ्या नागरिकांना मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे. महानगरपालिका स्तरावर क्षेत्रीय कार्यालयनिहाय ‘मतदान केंद्राविषयी जाणून घ्या’ उपक्रम राबविण्यात येत आहे. मतदारांना मतदान करण्याबाबत मोबाईलवर संदेश पाठविण्यात येत आहे. शहरातील शिकवणी केंद्र, महाविद्यालय आदी ठिकाणी युवा मतदारांकरीता जनजागृती मोहीम राबवून मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे, असेही डॉ. भोसले म्हणाले.

श्री. सिंह म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरातील मतदारांना भारत निवडणुकीच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मतदार जनजागृतीकरीता विविध उपक्रम राबविण्यात येत आहे, असेही श्री. सिंह म्हणाले.

श्री. पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेच्यावतीने आंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या तसेच स्वयंसहायता गटामार्फत मतदारांच्या घरोघरी जावून मतदानाविषयी जनजागृती करण्यात येत आहे.

यावेळी मतदान केंद्रांमधील नियोजन, पोलीस प्रशासनाची तयारी, वाहतूक नियोजन, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन आदी बाबींचा आढावा घेतला.

Total
0
Shares
Related Posts
Manoj Jarange Patil To Devendra Fadnavis | Manoj Jarange's warning to Chief Minister Devendra Fadnavis; Said - an ultimatum by 'this' date, otherwise the Maratha storm will stand strong and harass the government

Manoj Jarange Patil To Devendra Fadnavis | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा; म्हणाले – ‘या’ तारखेपर्यंत अल्टिमेटम, अन्यथा मराठे तुफान ताकदीने उभे राहून सरकारला त्रास देणार