मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कोणाचे सरकार असेल हे आत्ताच सांगणे कठीण आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुती (Mahayuti) आम्हीच सत्ता स्थापन करणार असल्याचे दावे करीत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मोठा दावा केला आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ‘निवडणुकीनंतर अजित पवार भाजपाबरोबरच (BJP) असतील, हे आताच सांगणे कठीण आहे’, असे भाष्य मलिक यांनी केले आहे.
माध्यमांशी बोलताना नवाब मलिक म्हणाले, ” विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाचेच सरकार येईल किंवा अजित पवार भाजपाबरोबरच असतील, हे आताच सांगणे कठीण आहे. या निकालानंतर कोण कोणाच्या बरोबर असेल हे सांगताच येत नाही. आता काही लोक सांगत आहेत की, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे काही तरी चालले आहे. अशी वेगवेगळी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे.
पाच वर्षांपूर्वी कोण कुठे होता? लोकांना कसे कसे पकडून आणले? हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडलेले आहे. मी राजकारणात नवखा नाही, त्यामुळे काय होऊ शकते, याची मला कल्पना आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले ही चुकीची बाब आहे. पण यावर आपल्याला आता काही बोलायचे नाही “, असे वक्तव्य नवाब मलिक यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले, ” राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नाही आणि कुणीही कायमचा मित्र नाही. शत्रू मित्र होतात, मित्र शत्रू होतात. २०१९ च्या विधानसभा नंतर काय होणार याचा कोणी अंदाज बांधला होता का? तसेच २०२४ च्या निकालानंतरची परिस्थिती काय असेल सांगता येत नाही. परिस्थितीनुसार काहीही घडू शकते त्यात अजित पवार किंगमेकरच्या भूमिकेत असतील अशी खात्री आहे”, असे मलिक यांनी सांगितले.