ठाकरे आणि पवार यांच्यासह ‘या’ 11 कुटूंबियांच्या हातात महाराष्ट्राचं ‘राजकारण’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – राज्यात सध्या विधानसभेचे जोरदार वारे वाहत आहे. सर्वच पक्ष विधानसभेच्या आखाड्यात उतरलेले आहेत. महाराष्ट्राचे राजकारण हे निवडक 11 परिवारांभोवती फिरत असते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या सहकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे जाळे पसरवून राजकारण करत असतात. यातील प्रत्येक परिवाराचे आपले आपले काही खास वैशिष्ट्य आहेत त्या विचारप्रणाली प्रमाणे ते काम करत असतात.

Image result for sharad pawar family

1. शरद पवार यांचे कुटुंब
शरद पवारांना महाराष्ट्रातील राजकारणाचे चाणक्य समजले जाते. त्यांची आई शारदा 1936 मध्ये पुणे लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या. कदाचित यामुळेच पवार वयाच्या 38 व्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले आणि पुढे चार वेळा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला. काँग्रेसमधून आपल्या राजकारणाला सुरुवात करणाऱ्या शरद पवारांनी 1999 मध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.

शरद पवारांचे राजकीय वारसदार म्हणून मुलगी सुप्रिया सुळे आणि पुतणे अजित पवार यांच्याकडे पहिले जाते. 2006 साली सुळे या राज्यसभेवर खासदार म्हणून गेल्या तर गेल्या तीन टर्म पासून बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. तर अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी लोकसभेला राजकारणात प्रवेश केला होता. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तसेच येणाऱ्या विधानसभेला शरद पवारांचे आणखी एक नातू रोहित पवार हे विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत.

Image result for raj thackeray and uddhav thackeray

2. स्वतःची ओळख बनवणारा ‘ठाकरे’ परिवार
1966 साली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. स्वतः निवडणूक न लढवता महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी आपली आणि आपल्या पक्षाची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोकण आणि मुंबईमध्ये शिवसेनेचे नेहमीच वर्चस्व राहिलेले आहे. सध्या शिवसेनेचे नेतृत्व बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे यांनी सेनेला राम राम ठोकत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा आपला नाव पक्ष सुरु केला.

एवढी वर्ष सुरु असलेली परंपरा मोडत बाळासाहेबांचे नातू आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आणि येणारी विधासभा ते मुंबईतूनच लढवणार असल्याची चर्चा आहे.

Image result for pritam munde and pankaja munde

3. मुंडे परिवाराचे नेतृत्व मुलींकडे
राज्यात ज्यावेळी काँग्रेस सरकार होते त्यावेळी महाराष्ट्रातून भाजपचे नेतृत्व गोपीनाथ मुंडे यांच्याकडे होते. राज्याचे गृहमंत्री तसेच मोदींच्या मंत्रमंडळात देखील गोपीनाथ मुंडे यांनी काम पाहिलेले आहे. मात्र 2014 मध्ये त्यांचे कार अपघातात निधन झाले. त्यानंतर मुंडे यांचे वारसदार म्हणून पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्याकडे पाहिले जाते. पंकजा राज्यात मंत्री आहेत तर प्रीतम मुंडे खासदार आहेत. तर गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आपले राजकारण सुरु ठेवलेले आहेत.

Image result for ashok chavan family

4. वडील आणि मुलगा दोघेही मुख्यमंत्री झालेला चव्हाण परिवार
महाराष्ट्राच्या राजकारणात चव्हाण कुटुंब पूर्वीदेखील कॉंग्रेसचा चेहरा होता आणि आजही आहे. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण हे 1975 आणि 1986 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी केंद्रात वित्त आणि गृह मंत्रालयासारख्या विभागांचीही जबाबदारी सांभाळली. सध्या त्यांचा राजकीय वारसा अशोक चव्हाणांच्या ताब्यात आहे आणि 2008 ते 2010 दरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील होते. ‘नांदेड’ जिल्ह्यात चव्हाण कुटुंबाचा मोठा राजकीय हस्तक्षेप आहे. अशोक चव्हाण यांची पत्नी अमिता देखील आमदार राहिल्या आहेत.

Image result for chagan bhujbal and sameer bhujbal

5. नाशिक भागात भुजबळ परिवाराचे वर्चस्व
बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आपले राजकारण सुरु केलेले छगन भुजबळ हे 1985 मध्ये मुबईचे महापौर झाले मात्र नंतर आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी शिवसेना सोडली आणि ते शरद पवारांसोबत काँग्रेस मध्ये आणि नंतर राष्ट्रवादीत सामील झाले. त्यानंतर त्यांनी नाशिकला आपला बालेकिल्ला बनवले आणि पुत्र पंकज भुजबळ यांच्यासोबत पुतणे समीर भुजबळ यांनासुद्धा राजकारणात सक्रिय केले.

Related image

6. कोकणचा राणे परिवार
नारायण राणे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या राजकारणाला सुरुवात केली होती. शिवसेनेकडून नारायण राणे यांना मुख्यमंत्री देखील करण्यात आले होते. मात्र 2005 साली राणेंनी सेना सोडली आणि ते काँग्रेसमध्ये सामील झाले. 2017 मध्ये त्यांनी स्वतःचा पक्ष काढला मात्र ते भाजपच्या सहयोगाने राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले. सध्या ते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र शिवसेना युतीत भागीदार असल्यामुळे राणेंच्या प्रवेशाला सेनेचा विरोध आहे.

Image result for dilip nilangekar and sambhaji nilangekar

7. निलंगेकर परिवाराचे महाराष्ट्रातील योगदान
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवाजी निलंगेकर 1985 – 86 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. निलंगेकर कुटुंब लातूर भागातुन आपले नेतृत्व करते. 1999 पासून जिल्ह्यातील निलंगे विधानसभा मतदार संघावर निलंगेकर कुटुंबातील सदस्यच निवडून येत आहेत. निलंगेकर यांचा राजकीय वारसा सध्या त्यांचा मुलगा असलेले दिलीप निलंगेकर यांच्या हाती आहे. आणि नातू संभाजी निलंगेकर सध्या फडणवीस सरकारमध्ये मंत्री आहेत.

Image result for radhakrishna vikhe and sujay vikhe

8. विखे पाटील परिवार आता बिजीपी मध्ये
बाळासाहेब विखे पाटील हे महाराष्ट्रातील एक जेष्ठ नेते होते. अहमदनगरमधून सात वेळा आमदार म्हणून ते निवडून आले होते. त्यांचा वारसा सध्या राधाकृष्ण विखे पाटील हे सांभाळत आहेत. नुकताच मुलाच्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि मुलगा खासदार होताच त्यांनी काँग्रेस सोडत भाजपचे कमळ हाती घेतले.

Image result for अमित देशमुख आणि धीरज देशमुख

9. देशमुखांचा वारसा त्यांच्या मुलांकडे
विलासराव देशमुख हे राज्याच्या राजकारणातील एक पावरफुल नेते होते. विलासरावांनी ग्रामपंचायती पासून आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती. त्यांच्या मृत्यू पश्चात मुलगा अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी त्यांचा राजकीय वारसा पुढे सुरु ठेवला आहे.

Related image

10. वसंतदादा पाटील यांचे कुटुंबीय
वसंतदादा पाटील यांचे राज्याच्या राजकारणावर चांगलेच वर्चस्व राहिलेले आहे. 1977 आणि 1983 अशा दोन वेळेस वसंतदादांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व केले. सध्या पाटील परिवाराची तिसरी पिढी राज्याच्या राजकारणात सक्रिय आहे. त्यांच्या पत्नी केंदीय मंत्री राहिलेल्या आहेत तर पुत्र प्रकाश आणि नातू प्रतीक हे सांगलीतून खासदार राहिलेले आहेत.

Image result for sushilkumar shinde and praniti shinde

11. शिंदे परिवाराचे नेतृत्व मुलीकडे
महाराष्ट्रातील उपनिरीक्षकापासून ते देशाचे गृहमंत्री पर्यंत प्रवास करणारे कॉंग्रेस नेते सुशील कुमार शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. यावरून त्यांच्या राजकीय शक्तीचा अंदाज घेतला जाऊ शकतो, परंतु यावेळी त्यांना निवडणुकीच्या रणधुमाळीत पराभव पत्करावा लागला. तर महाराष्ट्रात ते कॉंग्रेसचा दलित चेहरा मानले जातात आणि सोलापूर भागात त्यांचा महत्त्वपूर्ण प्रभाव आहे. सुशील कुमार शिंदे यांचा राजकीय वारसा त्यांची मुलगी प्रणिती शिंदे यांच्याकडे आहे. त्या सोलापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत.

Visit : policenama.com