राज्यभरात उत्साहात मतदानाला सुरुवात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  अनेक ठिकाणी पाऊस असतानाही राज्यभरात सोमवारी सकाळी ७ वाजता उत्साहात मतदानाला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी मतदान सुरु होण्यापूर्वीच मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या.

मतदानाला सामोरे जाण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्या इष्ट देवदेवतांचे दर्शन घेऊन निवडणुकीत यश मिळावे यासाठी देवापुढे प्रार्थना केली. अनेक उमेदवारांनी मंदिरांमध्ये जाऊन अभिषेक करुन आशिर्वाद घेतले.
वरळी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी सकाळीच सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते मतदार केंद्राकडे रवाना झाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूर येथे सकाळीच मतदान केले.
माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधील काटेवाडी येथे सकाळी ७ वाजता मतदान केले. त्यांच्यासमवेत पत्नी सुनेत्रा यांनीही मतदान केले. सातारा येथे छत्रपती उदयनराजे यांनी सकाळीच बाहेर पडून मतदान केले. मतदानाला जाण्यापूर्वी त्यांना पत्नीने ओवाळून शुभेच्छा दिल्या. यावेळी उदयनराजे भोसले यांनी सांगितले की, काही संकेत असतात, सात उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सात हा माझा लकी नंबर आहे. त्यामुळे मी सकाळी सात वाजता मतदान केले.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार सुजय विखे, शालिनीताई विखे, धनश्री विखे यांच्यासह सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. विरार येथील मनवेल पाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सकाळी साडेसहा वाजल्यापासून मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. कामाला जाण्यापूर्वी मतदान करुन जाणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथे सहकुटुंब मतदान केले. मावळ मधील उमेदवार राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला.

visit : Policenama.com