पाटील चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता फटका लगावतो, चंद्रकात पाटलांचा शरद पवारांना ‘टोला’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पवारांना पाटील कळलेलेच नाहीत असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे. पाटील चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता कसा फटका लगावतो हे समजतही नाही. माझा अनुभव तुम्ही घेतलेला नाही अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर शरसंधान साधले. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या शिवसेना-भाजप मेळाव्यात ते बोलत होते. तसेच काँग्रेसवरही टीका करताना भाजपमध्ये बंडखोरांची गय केली जाणार नाही असा इशारा बंडखोरांना दिला आहे.

चंद्रकांत पाटील यांना कोथरुड विधानसभा मतदारसंघामध्ये अडकवून ठेवल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी त्यांना पाटील कळलेलेच नाहीत. पाटील चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता कसा फटका लगावतो हे समजतही नाही असे चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. मनसेला आघाडीत न घेता त्यांनी कोथरूड मधून मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यांना माझ्या विरोधात उमेदवार मिळाला नाही त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याची वेळ आली, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

बळीचा बकरा बनवण्यासाठी मनसेला पाठिंबा –

कोथरुड विधानसभा मतदारसंघातून आपण मोठ्या फरकाने विजयी होऊ असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी आपल्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीला उमेदवार मिळाला नसल्याची टीका केली. कोथरुड मतदारसंघामध्ये शरद पवाराचे डायरेक्ट तर अजित पवारांचे इनडायरेक्ट काहीतरी चालले आहे. म्हणून अनेकवेळा पराभूत झालेले मनसेचे उमेदवार अॅड. किशोर शिंदे यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. कुणालातरी बळीचा बकरा करायचा म्हणून आघाडीने मनसेला पाठिंबा दिल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीला लगावला.

त्यांना प्राणवायू घालू नका –

काँग्रेस पक्षाला मरणकळा आल्या आहेत. असे असताना बंडखोरांनी त्यांना प्राणवायू घालू नये असे आवाहन त्यांनी बंडखोरांना केले आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत असताना राहुल गांधी विदेशात निघून गेले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात नऊ, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा वीस, कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा वीस तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवसाला सहा सभा घेत आहेत. पक्षासाठी सर्वच नेते मोठ्या प्रमाणावर कष्ट घेत आहेत. असे कष्ट करण्याची धमक काँग्रेसकडे नसल्याची टीका त्यांनी केली.

Visit : Policenama.com