विधानसभा 2019 : पुण्यात ‘महापौर’ विरुद्ध ‘गटनेता’ रंगणार सामना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस ने विधानसभा निवडणुकीसाठी आज दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये बहुचर्चित कसबा मतदार संघातून नगरसेवक अरविंद शिंदे तर शिवाजीनगर मतदार संघातून माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांची उमेदवारी जाहीर केली. शिंदे यांच्या उमेदवारी मुळे रविंद्र धंगेकर यांचा पत्ता कट झाला असून या मतदार संघामध्ये महापौर विरुद्ध गटनेता अशी लढत पाहायला मिळणार आहे.
कसबा मतदार संघातून सलग पाचवेळा आमदार असलेले गिरीश बापट हे लोकसभेत गेल्याने महापौर मुक्ता टिळक यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. बापट यांच्यासमोर अनेकवर्षं नशीब आजमावून पाहण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या विरोधकांना यामुळे बळ मिळाले. अशातच यापूर्वी मनसे कडून दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवणारे रविंद्र धंगेकर यांनी महापालिका निवडणुकीत काँग्रेस मध्ये प्रवेश केला आणि सलग चवथ्या वेळी नगरसेवक झाले. विशेष असे की मागील दहा वर्षापासून त्यांनी कसबा मतदार पिंजून काढल्याने त्यांचे नाव आघाडीवर होते.

दरम्यान मागील 7 वर्षे पालिकेत विरोधी पक्ष नेता म्हणून काम करताना नगरसेवक अरविंद शिंदे यांनी आक्रमक भूमिका बजावली आहे. अभ्यासू आणि चतुरस्त्र नगरसेवक म्हणून त्यांचा पालिकेत दबदबा आहे. काँग्रेस चे जेमतेम दहा नगरसेवक असताना 100 नगरसेवक असलेल्या भाजपला कायमच अडचणीत आणले आहे. विशेष असे की लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी मागितली होती. शेवटपर्यंत त्यांचे नाव चर्चेत होते. ती संधी त्यांना विधानसभेत देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

शिंदे हे कसबा मतदार संघाच्या लगत असलेल्या कॅन्टोन्मेंट मतदार संघात प्रतिनिधित्व करतात. यामुळे कसबा मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून दोन दिवसांपूर्वी बाहेरचा उमेदवार नको या आशयाचे फलक लावले होते. या नाराज मंडळींना आपल्याकडे वळविणे हे शिंदे यांच्यापुढे खरे आव्हान आहे. तसेच गिरीश बापट आणि अरविंद शिंदे हा राजकीय सामना नेहमीच रंगला आहे. यापार्श्वभूमीवर बापट किती ताकद उभी करणार यावर मुक्ता टिळक यांची लढत अवलंबून राहणार आहे.

Visit : policenama.com