वादळापूर्वीची शांतता नितेश राणेंच्या ट्विटमुळे ‘खळबळ’ !

सिंधुदूर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – नितेश राणे हे कणकवलीमधून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. गेल्या दोन दिवसांआधी काँग्रेसमध्ये असलेल्या नितेश यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि आता ते थेट भाजपमधून विधानसभा निवडणूक लढणार आहे. अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

4 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नितेश राणे एबी फॉर्म भरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपमध्ये प्रवेश न करताच नितेश राणे यांचं नाव थेट उमेदवारी यादीत दिसणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे ‘फक्त काही तास बाकी, वादळापूर्वीची शांतता’ असं सूचक ट्वीट नितेश राणे यांच्याकडून करण्यात आलं आहे.

मंगळवारी रात्री उशिरा नारायण राणे यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर या चर्चांना उधाण आले आहे. मात्र नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अद्याप तरी आलेला दिसत नाही.

कणकवली पुन्हा नितेश राणे जिंकणार का ?
2005 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंनी कोकणात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. शिवसेना सोडल्यानंतर राणेंनी लढवलेल्या पोट निवडणुकीत जोरदार यश मिळवले होते.  2009 च्या निवडणुकांआधी मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि राणेंचा मालवण कणकवली मतदार संघ विभागला जाऊन कणकवली, देवगड, वैभववाडी या तीन तालुक्यांचा एक मतदारसंघ झाला . कणकवलीच्या जागी मालवणला कुडाळ तालुका जोडला गेला आणि मालवण कुडाळ तालुक्यांचा दुसरा मतदारसंघ तर सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ले तालुक्यांचा तिसरा विधानसभा मतदारसंघ झाला.

2009 मध्ये पराभवाला सुरुवात
मतदार संघाची पुनर्रचना झाल्यानंतर राणेंना विजयाचे गणित काही जमले नाही. या वर्षीच्या विधानसभेत राणे समर्थक असलेल्या रवी फाटक यांचा भाजपच्या प्रमोद जठार यांनी पराभव केला आणि राणेंच्या सत्तेला सुरुंग लावला.

2014 चा पराभव
2014 च्या निवडणुकीत नारायण राणे यांना आपल्या मुलाचे राजकीय भविष्य पाहून मतदार संघ बदलत मुलाला सेफ झोनमधून उभे केले आणि स्वतः शिवसेनेच्या वैभव नाईकांकडून पराभव पत्करला.

राणेंना हा त्यांच्याच जिल्ह्यात झालेला पराभव अत्यंत जिव्हारी लागला. राणेंचा पराभव झाला तरी त्यांचा मुलगा नितेश राणेंनी मात्र काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि फाटकांना 34 मतांनी हरवणाऱ्या भाजपाच्या प्रमोद जठारांना तब्बल 25 हजार मतांनी हरवून कणकवली पुन्हा काबीज केली.

त्यानंतर नारायण राणेंनी काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निश्चय केला. मात्र युतीत असलेली शिवसेना काही केल्या नारायण राणेंचा भाजप प्रवेश होऊ देईना यामुळे नारायण राणेंनी स्वतःचा पक्ष काढत बीजेपीला समर्थन दिले. येणाऱ्या काळात राणे नेमकी कोणती राजकीय खेळी खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Visit : Policenama.com