नाना पटोलेंनी ‘अमान्य’ केली उपमुख्यमंत्री अजित पवारांची ‘सूचना’, केला ‘तो’ ठराव मंजूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सभागृहात आज सत्ताधारी महाविकासआघाडीतील मतभेद समोर आले. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज सभागृहात देशाच्या जनगणनेत ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी शिफारस त्यांनी केंद्र सरकारपुढे मांडली आणि महत्वाची बाब म्हणजे तो एकमताने मंजूरही करून घेण्यात आला.

दरम्यान, हा ठराव आजच न घेता आधी कामकाजामध्ये ठरवून पुढील अधिवेशनात घ्यावा अशी सूचना करण्यात आली होती, मात्र ती परत धुडकावण्यात आली. कामकाजाच्या पद्धतीचा रूढी व परंपरा यांचा दाखला देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सभागृहाचे कामकाज व्हावे असे मत व्यक्त केले होते. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा ठराव मांडण्याचे ठरलेले नव्हते, त्यामुळे आज हा ठराव मांडू नये. विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तो मांडावा अशी सूचना अजित पवार यांनी केली. अजित पवारांच्या या सूचनेला संसदीय कामकाज मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी पाठिंबा दिला.

तरीही अध्यक्ष पटोले यांनी आपल्या मतावर ठाम राहत याच अधिवेशनात ठराव मांडण्यावर अडून राहिले. पटोले यांच्या भूमिकेला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार पाठिंबा दिला. अध्यक्षांनी स्वतः हून ठराव मांडत त्याला सभागृहाने एकमताने मंजुरीदेखील दिली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/