विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी ठाकरे सरकारचा मास्टर प्लॅन; फडणवीस म्हणाले – ‘घाबरट सरकार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या विधानसभा अध्यपदी कुणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 1 मार्चपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अध्यक्ष निवडीसाठी ठाकरे सरकारची कसोटी लागणार आहे. अध्यक्ष निवडीवेळी कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी ठाकरे सरकारने मास्टर प्लॅन तयार केला आहे. मास्टर प्लॅन तयार करण्यापूर्वी सरकारने एका मोठ्या वकिलाचा सल्ला घेतल्याचे समजतय. हा प्लॅन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरत यांनी तयार केला आहे.

काय आहे सरकारचा मास्टर प्लॅन ?

विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी गुप्त पद्धतीने मतदान करण्यात येते. यावेळी दगाफटका होऊ नये यासाठी ठाकरे सरकारने काळजी घेतली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान न घेता पहिल्याच दिवशी आवाजी मतदानावर अध्यक्षपदाचा तिढा सोडवायचा असा विचार ठाकरे सरकारचा आहे. किंवा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत अधिवेशन पुढे ढकलायचे आणि शेवटी अध्यक्ष निवडायचा, असा मास्टर प्लॅन सरकारचा आहे.

फडणवीसांची बोचरी टीका

बहुमत असताना देखील घाबरणारे सरकार आपण कधीच पाहिले नसल्याची बोचरी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सरकारमध्ये एवढे बहुमत असताना एवढे घाबरायचे कशाला ? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. यावरुन सरकारवर विरोधी पक्षाचा दबदबा असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आमचंही मनोरंजन होत आहे, आमदारांचं भलं होईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

विधानसभा अध्यपदी कोण ?

केसी पाडवींचे नाव आघाडीवर –  महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना समसमान वाटप कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे कोणतेही बदल यामध्ये होणार नाहीत. केसी पाडवी हे आदिवासी विकास मंत्री असून विधानसभा अध्यपदी त्यांची निवड होऊ शकते. पाडवी हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात. ते अक्कलकुवा मतदारसंघातील आमदार आहेत. काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी अनेक मंत्रीपद भूषवली आहेत.

भोरचे आमदार संग्राम थोपटे –  नाना पटोले यांच्या रिक्त जागेवर तीन काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये भोर विधानसभा आमदार संग्राम थोपटे यांचे नाव समोर आले आहे. थोपटे हे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी मंत्री म्हणून देखील काम केले. संग्राम थोपटे यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाची तोडफोड केली होती. थोपटे यांनी पुणे जिल्ह्यात काँग्रेसला वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांची ही बाजू जमेची आहे.

आमदार सुरेश वारपूडकर –  पाथरी मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे आमदार सुरेश वारपूडकर यांचे नाव समोर येत आहे. 1998 मध्ये कृषी राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. परभणीतून 1998-99 मध्ये खासदार होते. अत्यंत मितभाषी आणि सर्वांशी चांगले राजकीय संबंध ही वारपूडकर यांची जमेची बाजू आहे.

आमदार अमीन पटेल –  अमीन पटेल हे मुंबईतील आमदार असून त्यांची तिसरी टर्म आहे. मुंबादेवी मतदारसंघातून ते निवडून आले आहे. मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं आहे. मुस्लिम चेहरा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससाठी फायद्याचा असला तरी शिवसेना मात्र त्यास तयार होईल का याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.