काय सांगता ! होय, होळी दिवशी जावयाला गाढवावर बसवून गावातून फिरवलं जातं, दिले जातात त्याच्या आवडीचे कपडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतातल्या प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने सण साजरा करण्याची प्रथा आहे. नुकताच होळी हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. परंतु महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एका गावात होळी सण अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. बीड जिल्ह्यातल्या विडा गावात सर्वात नव्या जावयाला चक्क गाढवावरून फिरवले जाते. संपूर्ण गावात त्याची अशी गाढवावर बसून मिरवणूक काढली जाते. जावयाला त्याच्या आवडीचे नवे कपडे घातले जातात. होळीचा हा अनोखा सोहळा पाहण्याकरिता आसपासच्या गावातले लोक देखील गर्दी करतात. ही प्रथा गेल्या ९० वर्षांपासून सुरु आहे.

याबाबत तिथल्या स्थानिक पत्रकाराने सांगितले की, होळी सुरु होण्यापूर्वी गावातील सदस्य सर्वात नवीन जावयाला निवडतात हे करण्यासाठी तीन चार दिवस लागतात. त्यानंतर एकदा का जावयाची निवड झाली की गावकरी त्याच्यावर नजर ठेऊन असतात. कारण निवडला गेलेला जावई पळून जाऊ नये. यंदाच्या होळी सणाला गाढवावरील मिरवणुकीचा मान गावातील दत्तात्रय गायकवाड नामक जावयाला मिळाला.

गावातील रहिवासी अंगण देठे सांगतात की, ही परंपरा नव्वद वर्षांपूर्वी खेड्यातील प्रतिष्ठित आनंदराव देशमुख यांनी सुरू केली होती. देठे यांनी सांगितले की, “परंपरा आनंदराव यांच्या जावईपासून सुरू झाली आणि तेव्हापासून चालू आहे. लग्नानंतर मी इथे आलो तेव्हा मलासुद्धा गाढवावरून फिरवले होते. “गाढवावरील ही मिरवणूक गावाच्या मध्य भागातून सुरू होते आणि सकाळी ११ वाजता हनुमान मंदिरात संपते जिथे गावातील लोक या जावयाला कपडे देतात.