आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण: पुरस्कार जाहीर

पोलीसनामा ऑनलाईनः ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना राज्य सरकारचा महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 25) महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. निवडीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यंत्री अजित पवार यांनी आशाताईंचे अभिनंदन केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र भूषण पुरस्कार नेमका कुणाला देणार याची चर्चा सुरु होती. अखेर ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित झाले आहे. यावेळी बैठकीस समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे आदी उपस्थित होते.