विधानसभा निवडणूक : जागा वाटपात भाजपाचा ‘सस्पेंस’, शिवसेनेसोबत 50-50 चा विचार नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यामध्ये प्रचारापासून जागावाटप ते सर्वच गोष्टींचा समावेश आहे. शिवसेना आणि भाजप या सत्ताधारी पक्षांमध्ये देखील जागावाटपांसंदर्भात चर्चा सुरु होणार असून लवकरच यावर बैठक होणार आहे.

मात्र मिळालेल्या माहितीनुसार, जागावाटपात भाजप खूप सावधताना बाळगत असून यासाठी पक्षाने विशेष योजना बनवली आहे. मित्रपक्षांना ते 100 पेक्षा जास्त जागा देणार नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळेच शिवसेनेकडून जागावाटपाची केली जाणारी मागणी भाजप टाळताना दिसून येत आहे. मात्र शिवसेनेनुसार लोकसभा निवडणुकीत ठरल्याप्रमाणे या निवडणुकीत अर्ध्या अर्ध्या जागांचे वाटप ठरल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे आता जागावाटप हे कशाच्या आधारावर होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याआधी देखील भाजपने अनेक जागावाटप चर्चा फेटाळल्याने दिसून आले आहे. 288 पैकी 100 जागा फक्त शिवसेनेला देणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र आधी त्यापेक्षा देखील कमी जागांचा प्रस्ताव शिवसेनेपुढे ठेवला जाणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर प्रचंड आत्मविश्वासात असलेल्या भाजपने केलेल्या सर्व्हेत त्यांना स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे संकेत मिळाल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासुन ज्या पद्धतीने विरोधी पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, ते पाहता भाजप हि निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार तशी तयारी देखील सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे.