पक्षासाठी कष्ट उपसूनही माझी अवहेलना : अनिल गोटे

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन-पक्षासाठी कष्ट उपसूनही माझी अवहेलना करण्यात येत आहे असे वक्तव्य करत आता धुळ्याचे भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी स्वपक्षीयांवरच जोरदार हल्लाबोल केला आहे. पक्षासाठी कष्ट उपसूनही माझी अवहेलना करण्यात येत असून, प्रचारसभेतही बोलू दिलं नसून दानवेंच्या दौ-यावेळी मला वगळलं, अशी खंत गोटे यांनी व्यक्त केली आहे.

“धुळे महापालिकेची जबाबदारी महाजनांकडे का दिली, मी प्यादं बनण्याइतका लेचापेचा नाही. महाजनांकडे धुरा देऊन माझ्यावर अविश्वास दाखवला. धुळं म्हणजे जळगाव किंवा सांगली नाही. सुभाष भामरेंची पात्रता नसताना त्यांना पक्षानं तिकीट दिलं. सुभाष भामरे भाजपात गटबाजीचं राजकारण करतात. त्यामुळे 19 नोव्हेंबरला राजीनामा देण्यावर मी ठाम आहे. माझी खंत मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे. तरीही पुन्हा मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावलं तर जाईल, पण स्वतःहून जाणार नाही” असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सबरीमाला मंदिर प्रवेश : जानेवारीत होणार सुनावणी
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर 48 पुनर्विचार याचिका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –सबरीमाला मंदिरातील स्त्रियांच्या प्रवेशावरून चाललेल्या वादावर आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. केरळमधील सबरीमाला डोंगरावरील प्रसिद्ध आयप्पा मंदिरामध्ये सर्व वयाच्या महिलांना प्रवेश देण्याबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या 48 पुनर्विचार याचिकांवर 22 जानेवारी 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मात्र आधीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली नाही.

आयप्पा मंदिरामध्ये सर्व वयाच्या महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय 28 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायाधिशांच्या खंडपीठाने  दिला होता. या निकालाच्या निषेधार्थ विविध हिंदू संघटनांनी केरळमध्ये बंद पाळला होता. तसेच, काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केल्या आहेत.

दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका मान्य करत यावर सुनावणी घेण्याची तयारी सरन्यायाधीश रंजन गोगाई, न्यायमूर्ती आर एफ, नरीमन, ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड आणि इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठाने दर्शविली आहे. त्यामुळे आता या याचिकांवर 22 जानेवारी 2019 रोजी खुल्या न्यायालयात सुनावणी घेण्यात येणार आहे.