‘या’ भाजप आमदाराकडून माणुसकीचं दर्शन, अपघातग्रस्तांना स्वत:च्या गाडीतून हॉस्पिटलला नेले

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन – अपघात झाला कि व्यक्ती नेहमी त्यांना मदत करण्याऐवजी पोलिसांच्या ससेमिऱ्यापासून वाचण्यासाठी पळ काढत असतात, मात्र नागपूर येथील भाजप आमदार गिरीश व्यास यांनी याचा उत्तम आदर्श समोर ठेवला आहे. वर्धा नागपूर मार्गावर पवनारजवळ नागपूरकडून येताना कारवरचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. आमदारांनी लागलीच जखमींना गाडी बाहेर काढत विचारपूस केली. तसेच जखमींना आपल्या वाहनात नेऊन स्वतः रुग्णालयात दाखल करत माणुसकीचा परिचय दिला.

नागपूरच्या मानेवाडा परिसरातील रहवासी हरीश पाटेकर, पत्नी कविता, रत्ना जांभळे आणि अरुण जांभळे हे वर्ध्यातील पुलंगाव येथे एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात होऊन गाडी पलटी झाल्याने कारमधील सर्व प्रवासी जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करून त्यांच्या नातेवाईकांना देखील फोन करून या अपघाताची माहिती आमदारांनी दिली.

दरम्यान, रस्त्यावर अनेक अपघात होतात, सर्वच जण मदतीसाठी पुढे सरसावतातच असे नाही. मात्र, भाजप आमदार गिरीश व्यास यांनी अपघातग्रस्तांना मदत करुन, लोकांनी अशावेळी मदत करायला पुढे यावे, असाही संदेश दिला आहे.