Maharashtra : चिमुरचे भाजप आमदार, त्यांच्या वडिलांसह 5 जणांना राजस्थानमध्ये अटक (व्हिडीओ)

सीकर : वृत्तसंस्था – शांती भंग केल्या प्रकरणी आणि पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी महाराष्ट्रातील भाजपचे चिमुरचे आमदार कीर्ती कुमार यांना सीकर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.पोलिसांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणे, शांती भंग करण्याच्या आरोपाखाली कीर्ती कुमार यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणात सीकर पोलिसांनी नितेश भगडिया, त्यांचे पूत्र आणि भाजप आमदार कीर्ती कुमार, श्रीकांत, अंकित आणि यवतमाळमध्ये राहणारे सुशील कोठारी यांना ताब्यात घेतले आहे. आमदार कीर्ती कुमार हे कुटुंबासोबत सालासर हनुमान दर्शनासाठी जात होते.

 

 

 

 

काय आहे प्रकरण ?

सीकर मधील कल्याण कॉलेज समोर नो एन्ट्री असताना बस घुसवल्याने बस आडवण्यात आली. त्यामुळे याठिकाणी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने चलान फाडले. बस रोखून कागदपत्र मागितल्याचा राग बसमध्ये बसलेल्या आमदारांना आला. चलान कापल्यानंतर आमदार कर्ती कुमार यांनी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली व त्याचा युनिफॉर्म फाडला, असा आरोप पोलिसांनी केला आहे. तर ड्युटीवर तैनात वाहतूक महिला कर्मचाऱ्यांना वाईट वागणूक व अभद्र शब्दांचा वापर केल्याचंही सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली नसल्याचे सांगत पोलिसांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगून पोलीस कर्मचाऱ्यानेच मारहाण केल्याचा आरोप कीर्ती कुमार यांच्या वडिलांनी केला आहे.

कीर्ती कुमार यांच्या वडीलांनी सांगितले…

या प्रकरणात कीर्ती कुमार यांचे वडिलांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, वन वे च्या मार्गावर कोठेही बोर्ड नव्हता. त्यामुळे येथे नो एन्ट्री असल्याचे लक्षात आले नाही. तर त्यांनंतर पोलीस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी आरेरावीची भाषा करु लागले. त्यापैकी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने माझी कॉलर पकडली. यामुळे बाचाबाची झाली. असे कीर्ती कुमार यांच्या वडीलांनी सांगितले.