राज्यात भाजपनं दिले स्वबळाचे ‘संकेत’, भाजप अध्यक्ष जेपी नड्डांनी केली मोठी घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नवी मुंबई येथील नेरूळमध्ये भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन होत असून त्यानिमित्ताने भाजप विधानसभा निवडणुकीनंतर पक्ष परत संघटनात्मक बांधणीला सुरुवात करत आहेत. चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष पद मिळाले असून त्यांनी भाषणात राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. हे सरकार पडावे अशी आम्ही वाट बघत नाही, असे म्हणत आपापसातील भांडणामुळेच हे सरकार पडेल, असे ते म्हणाले आहेत. दरम्यान भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी महाराष्ट्राला ‘एकला चलो रे’चे संकेत देत राज्यात अभद्र युती झाल्यामुळे सगळे भाजपविरुद्ध एकत्र आले आहेत, असे ते म्हणाले. तसेच त्या सगळ्यांविरुद्ध लढत भाजप यश खेचून घेईल, अशा घोषणाच त्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान चंद्रकांत पाटीलही बोलत होते. ते म्हणाले की, माझ्यासारख्या राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या, सर्वसामान्य घरातून आलेल्या माणसाची दुसऱ्यांदा प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली याबद्दल नेते मंडळींचे आभार. शिवसेनेला ज्यांच्यामुळे स्थान मिळाले त्या रामभाऊ कापसे यांना शिवसेना विसरली. १९८५ नंतर पहिल्यांदाच भाजपच्या रुपाने कुठल्या एका पक्षाला पुन्हा एकदा १०० जागा मिळाल्या.

मात्र अनैतिक युती झाल्यामुळे आपल्याला बाजूला ठेवून सरकार स्थापन झाले. राज्यात सर्वाधिक मतं ही भाजपला मिळाली असून ती १ कोटी ४२ लाख होती. लोकांनी भरभरुन मतदान केलं असून आपलं सरकार असावं, अशी लोकांची इच्छा आहे. पण शिवसेनेनं दगाबाजी केली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा करायला सेनेला वेळ होता. पण देवेंद्रजींचा फोन घ्यायला वेळ नव्हता. संजय राऊत यांनी त्यांना भाजपसोबत राहायचं नाही हे आधीच ठरवले असल्याचे सांगितले होते. मग युती का केलीत? फक्त स्वत:ला मुख्यमंत्री आणि मुलाला मंत्री करण्यासाठीच सरकार केलं गेलं. तसेच सावरकरांना समलैंगिक म्हटले जाते. यावर शिवसेना हे सहन करते. शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला गेला त्याबद्दल शिवसेना बोलत नाही. हे सरकार पाडण्यासाठी आपण काही करायचं कारण नाही. आपण एक सक्रिय विरोधक म्हणून काम करण्याची गरज आहे.